“भावनेच्या आहारी जाऊन…”, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर केतकीची सूचक पोस्ट

मुंबई | Ketaki Mategaonkar On Shraddha Walkar Case – सध्या श्रद्धा वालकर खून प्रकरणानं (Shraddha Walkar Case) देशात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. तसंच या प्रकरणाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. या प्रकरणावर सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण व्यक्त होत आहे. यामध्ये आता अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकरनं (Ketaki Mategaonkar) यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.
केतकी माटेगावकरनं श्रद्धा खून प्रकरणावर भाष्य केलं आहे. केतकी म्हणाली की, “एक सुंदर असं जग आपले आई वडील आपल्याला देतात. सुखसोयींनी आणि उत्तम सुरक्षित असं हे सगळे आपण बघू शकतो. कारण वाईट गोष्टी आपले पालक आपल्या जगापर्यंत पोहोचू देत नाहीत. एक चुकीचा निर्णय मात्र आपले आयुष्य बदलू शकतो. श्रद्धा एक सुंदर तरूण मुलगी तिचं काय चुकलं? ती प्रेमात पडली, मात्र चुकीच्या व्यक्तीवर तिनं विश्वास ठेवला. काल ही बातमी वाचून माझी झोप उडाली”
पुढे ती म्हणाली, “माझ्या सर्व मैत्रिणींना माझा सल्ला आहे. कृपया विश्वास ठेवू नका. अगदी कुणावरच ठेवू नका. तुम्ही तुमचं भविष्य सुंदर घडवू शकता. अगदी एकट्यानेही…जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहा. भावनेच्या आहारी जाऊन मूर्ख बनू नका. एकच सांगेन, विश्वास ठेवा पण आहारी जाऊ नका.” केतकीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
