पावसाळ्यातील पहिल्या महिन्यात धरणांमधील पाणीसाठ्याची घसरलेली पातळी आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठवडाभरापासून पडत असलेल्या पावसामुळे पुणे शहराला पिण्याचा पाण्याच्या पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे निम्म्याहून अधिक भरली आहेत. यामुळे पुणे शहरातील पाणी कपातीचे संकट आता कायमचे दूर झाले आहे. सध्या ‘खडकवासला’ प्रकल्पात असलेला पाणीसाठा हा आता पुणेकरांना पुढचे किमान आठ महिने पुरू शकणार आहे.
‘खडकवासला’ प्रकल्पांतील चारही धरणांमधील मिळून एकूण उपलब्ध पाणीसाठा हा आता १४.६३ टीएमसी इतका झाला आहे. या धरणांमधील एकूण उपलब्ध पाणीसाठ्याचे हे प्रमाण ५०.१८ टक्के इतके झाले आहे. त्यातच आता पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याने, या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होणार आहे.
शहराला पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून गेल्या वर्षीच्या जुलैच्या २२ तारखेला १४.१२ टीएमसी (४८.४१ टक्के) इतका पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत यंदा या धरणांमध्ये ०.५१ टीएमसी (१.७७ टक्के) अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये ५७.८७ टीएमसी पाणी
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील टाटा समूहाच्या सहा धरणांव्यतिरिक्त उर्वरित २६ धरणांमधील एकूण उपलब्ध पाणीसाठा हा ५७.८७ टीएमसी इतका झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा हा पाणीसाठा ३.३४ टीएमसीने कमी आहे. गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला हा पाणीसाठा ६१.२१ टीएमसी इतका होता. पुणे जिल्ह्यात एकूण ३२ धरणे आहेत.
यापैकी सहा धरणे ही टाटा समूहाची आहेत. टाटा समूहाची धरणे वगळता उर्वरित २६ धरणे आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे. सर्व प्रमुख धरणांसह जिल्ह्यातील सर्व धरणांतील मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ही १९८.३४ टीएमसी इतकी आहे.
टाटा समूहाच्या धरणांमध्ये १९.९७ टीएमसी साठा
पुणे जिल्ह्यात टाटा समूहाची एकूण सहा धरणे आहेत. या सर्व धरणांमधील एकूण उपलब्ध पाणीसाठा क्षमता ही ४२.७६ टीएमसी इतकी आहे. यापैकी आतापर्यंत या धरणांमध्ये एकूण १९.९७ टीएमसी (४६.७० टक्के) पाणी जमा झाले आहे. टाटा समूहाच्या धरणांमध्ये मुळशी, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा व कुंडली या धरणांचा समावेश आहे.
‘खडकवासला’तील आजचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
(कंसात गतवर्षीचा आजचा पाणीसाठा)
- टेमघर — १.४२ (१.२१)
- वरसगाव — ५.६१ (६.२६)
- पानशेत — ६.१३(५.४२)
- खडकवासला — १.४८ (१.२३)
- एकूण — १४.६३ (१४.१२)