क्रीडादेश - विदेशमहाराष्ट्र

आज ठरेल नंबर वन; महाराष्ट्र-हरियाणात फाइट

खेलो इंडिया यूथ गेम्स |

पंचकुला Khelo India Youth Gems | महाराष्ट्राने कालपासून हरियाणावर पदकतालिकेत आघाडी घेतली आहे. मात्र, ही आघाडी केवळ एकाच सुवर्णाची आहे. त्यामुळे स्पर्धेच्या उद्या (सोमवारी) शेवटच्या दिवशी हातघाईची लढाई होणार आहे. महाराष्ट्राचे खो-खोचे दोन्ही संघ फायनलमध्ये गेल्याने ती सुवर्णपदके हक्काची समजली जात आहेत. टेबल टेनिसमध्येही महाराष्ट्राने चांगलेच आव्हान उभे केले आहे. तर हरियाणाचे शक्तिस्थान समजल्या जाणार्‍या बॉक्सिंगमध्येच त्यांची आणि महाराष्ट्राची खरी लढाई होणार आहे. कारण महाराष्ट्राचे चार बॉक्सर गोल्डन पंच मारण्यासाठी सज्ज आहेत.

महाराष्ट्र आता ४१ सुवर्ण, ३६ रौप्य, ३० कांस्यपदकांसह अग्रस्थानी आहे. हरियाणा ४१ सुवर्ण, ३५ रौप्य, ४३ कांस्यपदकांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे

रविवारी चार सुवर्ण, २ रौप्य आणि ५ कांस्यपदके मिळाली. आर्चरीमध्ये १ सुवर्णपदक आले. त्यांनी रौप्यपदकही मिळवून दिले. टेबल टेनिसमध्ये दीया चितळे पुन्हा सुवर्ण घेऊन आली. जलतरणात अपेक्षा फर्नांडिसमुळे सुवर्णसंख्या वाढली. तिने आज दोनदा सुवर्ण कामगिरी केली. बॉक्सिंगमध्ये मात्र तब्बल पाच कांस्यपदके आली. सिमरन वर्मा (मुंबई), रशिका होले (सातारा), आदित्य गौड (पुणे), माणिक सिंग (अकोला), सई डावखर (पुणे) यांनी बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक मिळवून महाराष्ट्राची पदकसंख्या शंभरीपार नेली. आज सकाळी आर्चरीमध्ये कम्पाउंडमध्ये सातारच्या आदिती स्वामीने सुवर्णपदक मिळवून दिले. अहमदनगरच्या पार्थ कोरडेला रौप्यपदक मिळाले.

अपेक्षाची सुवर्णभरारी सुरूच :
जलतरणात अपेक्षा फर्नांडिसमुळे महाराष्ट्राची खरोखरच नंबर वनची अपेक्षापूर्ती होण्याची शक्यता बळावली आहे. तिने आज दोन सुवर्णपदके मिळवून दिली. ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्ण घेतल्यानंतर २०० मीटर बटरफ्लायमध्येही सुवर्णपदक उंचावले. ४ बाय १०० फ्रीस्टाईल रिलेमध्ये एक रौप्यपदक आले. मुलांच्या या रिले संघात अर्जुनवीर गुप्ता, रिषभ दास, उत्कर्ष गौर आणि आर्यन वर्णेकर यांचा समावेश आहे.

गोल्डन पंचसाठीची लढाई
बॉक्सिंगमध्ये व्हिक्टर सिंग (पुणे) हा चंदिगडच्या अंकितसोबत सुवर्णपदकासाठी लढेल. सुरेश विश्वनाथची फाईट हरियाणाच्या आशिषसोबत आहे. विजय सिंग उत्तर प्रदेशच्या आकाश कुंदीरसोबत तर कुणाल घोरपडे याचा हरियाणाच्याच दीपकसोबत सामना होईल.

टे.टे.मध्येही दियाचे सुवर्ण
टेबल टेनिसमध्ये मुलींमध्ये एकेरीत मुंबईच्या दिया चितळेने पुन्हा महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. तिने दिल्लीच्या लतिका नारंग हिचा पराभव केला. सोमवारी दिल्लीच्याच आदर्श क्षेत्रीसोबत महाराष्ट्राच्या दीपित पाटीलचा कांस्य पदकासाठी सामना होणार आहे.

खो खो – महाराष्ट्र-ओरिसा अंतिम लढत :
खो-खो स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी पश्चिम बंगालचा तर ओरिसाने पंजाबचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राच्या मुलांनी दिल्लीचा तर ओरिसाने पश्चिम बंगालचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या मुलींनी प. बंगालचा ९-८ (९-३) असा एक डाव १ गुणाने पराभव केला. यामध्ये महाराष्ट्रातर्फे अश्विनी शिंदेने संरक्षण केले, प्रीती काळेने पळतीचा खेळ करत १ खेळाडू बाद केला. दिपाली राठोडने नाबाद संरक्षणाचा खेळ केला.

मयुरी पवार, जान्हवी पेठेने पळतीचा खेळ केला. संपदा मोरेने ३ खेळाडू बाद करताना संरक्षणाचा खेळ केला. पश्चिम बंगालतर्फे इशिता विश्वासने १ खेळाडू बाद केला. उपांत्य सामन्यात मुलांमध्ये महाराष्ट्राने दिल्लीचा १५-९ (१५-५) असा १ डाव ६ गुणांनी पराभव केला. विजयी संघातर्फे आदित्य कुडाळेने १ गडी, मिलिंद आर्यनने १ गडी तर ॠषिकेश शिंदेने २ गडी बाद केले. सुफियान शेख आणि अक्षय तोगरेने प्रत्येकी ३ गडी बाद करत आक्रमणाची धुरा उत्तमरितीने सांभाळली. दिल्लीतर्फे सत्यमने, अजय कुमारने २ गडी बाद केले.

आर्चरीमध्ये आदितीचा सुवर्णवेध
आर्चरीमध्ये सातार्‍याच्या आदिती स्वामीने सुवर्णवेध घेतला. कम्पाउंड राऊंडमध्ये तिने हे यश मिळवले. अहमदनगरच्या पार्थ कोरडेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये