बनात ये ना… जवळ घे ना…
-संजय सपकाळे
कविवर्य शांताराम नांदगावकर यांनी तमाम रसिकांना आपलंस केलं आहे. त्यांचे चाहते त्यांना कधीच विसरू शकत नाहीत. नांदगावकरांनी निर्माण केलेलं मराठमोळं साहित्य, काव्य, गाणी ही सतत रसिकांच्या कानात रुंजी घालत राहतात. शब्दांचा राजा असलेल्या कविवर्य शांताराम नांदगावकर यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्ताने…
आपल्या कवितांनी आणि भावगीतांनी प्रसिद्ध कवी आणि गीतकार शांताराम नांदगावकर यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नांदगावकर यांचा जन्म कोकणातील कणकवली येथील नांदगाव येथे झाला. त्यानंतर त्यांचे कुटुंब मुंबईमधील परळ येथे रहायला आले. त्यांचे शिक्षण परळ येथेच शिरोडकर शाळेत झाले.
शांताराम नांदगावकर यांनी आपल्या कार्यकाळात अनेक प्रसिद्ध चित्रपटांमधील गीतांचे लेखन केलं आहे. त्यात खास करून अशी ही बनवाबनवी, गंमत जंमत, नवरी मिळे नवऱ्याला, तू सुखकर्ता, धुमधडाका, अष्टविनायक आणि पैजेचा विडा या प्रसिद्ध मराठी चित्रपटांमधील गाण्यांचे लेखन नांदगावकर यांनी केले आहे.
नांदगावकर यांनी त्यांची पहिली कविता इयत्ता दहावीत असताना केली. ते देवासमोर दिवा लावून अभ्यासाला सुरुवात करायचे. त्यांना दिव्याच्या ज्योतीबाबत आकर्षण वाटत होतं. त्यावेळी त्यांना वाटायचे की शायर किंवा कवी हे दिव्यामधील ज्योतीबद्दल चुकीचे लिहितात. ‘शमा जले परवाने आये’, असं तेव्हाचे शायर म्हणत होते, ते त्यांना आवडतं नव्हते. एकदा ते शाळेतील मुलांसोबत सिनेमा बघायला गेले. हा मराठी सिनेमा शाहीराच्या जीवनावर होता. त्यामध्ये देखील त्या शाहीरानं ज्योतीबाबत केलेलं वर्णन शांताराम नांदगावकर यांना आवडलं नाही. तेव्हा नांदगावकर यांचे मित्र त्यांना म्हणाले, शांताराम तू या कल्पनेवर चांगली कविता लिही. शाळेचा अभ्यास करताना त्यांना दिव्याच्या ज्योतीवर कविता सूचली. ‘का उगा पतंगा जळसी?’ ही कविता तेव्हा त्यांनी लिहिली. ही त्यांची पहिली कविता.’
नांदगावकर यांची गाणी अजरामर आहे. त्यात अशी नजर घातकी बाई…, अशीच साथ राहू दे.., अश्विनी ये ना.., अष्टविनायका तुझा महिमा कसा.., रुपेरी वाळूत, असाच यावा पहाटवारा.., इवले इवले जीवही येती.., गा गीत तू सतारी.. ही शांताराम यांची गाजलेली गीते आहेत. शब्दांचा राजा आणि एक अजातशत्रू म्हणजेच कविवर्य शांताराम नांदगावकर . त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणात आहे. नांदगावकर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या गाण्याची हमखास आठवण होऊन ओठांवर ती गीतं येऊ लागतात. त्यांची अनेक गीते चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहेत.
शांताराम नांदगावकर यांची गाजलेली गीते अनुरागाचे थेंब झेलती प्रीत – लतेची पानें (संगीत – अशोक पत्की; गायिका – अनुराधा पौडवाल), अशीच साथ राहू दे, अश्विनी ये ना, अष्टविनायका तुझा महिमा कसा (सहकवयित्री – शांता शेळके; संगीत – अनिल-अरुण; गायकः अनुराधा पौडवाल, पंडित वसंतराव देशपांडे), असाच यावा पहाटवारा, इवले इवले जीवही येती, कुठं कुठं जायाचं हनिमुनला, झुंजुर-मुंजुर पाऊस माऱ्यानं तळव्यावर, दलितांचा राजा भीमराव माझा, दाटून कंठ येतो, पाहिले न मी तुला, प्रथम तुला वंदितो, जगू कसा तुझ्याविना मी राणी गं (गायक : किशोर कुमार), रुपेरी वाळूत माडांच्या बनात, हे जीवन म्हणजे क्रिकेट, राजा हुकला तो संपला (गायक – सुनील गावसकर) शिवाय १९८७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर दलितांचा राजा ह्या अलबमसाठी अप्रतिम अशी गाणी लिहिलेली आहे.
रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना
बनात ये ना, जवळ घे ना
चंदेरी चाहूल, लावित प्रीतीत ये ना
प्रीतीत ये ना, जवळ घे ना
बेधुंद आज आसमंत सारा
कुंजात गात मंद धुंद वारा
दाटे उरी प्रिया तुझा इशारा
देहावरी फुले असा शहारा
तुझा इशारा, असा शहारा
चिंब पावसात हे गाणे एेकताना मन धुंद होते. आणि खास करून नवतरुण तरुणींसाठी हे अत्यंत गोड गुलाबी असे गीत म्हणजे शांताराम नांदगावकर यांची मराठी रसिकांना देणगीच आहे. हे गाणं ऐकताना मन अगदी टवटवीत होतं. या गाण्यातील शब्दांत आणि चालीत तसा आर्जवी सूर लपलेला आहे. ऐकताना अंगावरुन मोरपीस फिरल्यासारखं वाटतं. आजही हे गाणं ऐकलं की कोकणात गेल्यासारखं वाटतं. आजच्या काळात अशी गाणी तयार होत नाहीत. पण जेव्हा केव्हा हे असे जुने गाणे ऐकले की मन अगदी प्रसन्न होते.