‘किरीट सोमय्या स्वत:च गायब आहेत याचा अर्थ…’- दीपाली सय्यद यांचा निशाणा

मुंबई : काल भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. यानंतर सोमय्या यांना कधीही अटक होऊ शकते. तसंच किरीट सोमय्या हे नेहमीच मोकळेपणाने त्यांचं मत मांडताना दिसतात. पण गेल्या काही दिवसांपासून ते या सगळ्यापासून लांब आहेत. यावर शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या स्वतःच गायब आहेत. याचा अर्थ आता लोकांनी बघावं आणि कोण काय आहे याबाबत लोकांनी स्वतः निर्णय घ्यावा असा टोला दीपाली सय्यद यांनी लगावला आहे.
दीपाली सय्यद यांनी आज शिवसेनेतर्फे आयोजित महिला उद्योजक मेळाव्यात हजेरी लावली होती. यावेळी किरीट सोमय्या गायब असल्याबाबत दीपाली सय्यद म्हणाल्या, “सध्या घाणेरडे राजकारण चालू आहे. एकमेकांच्या घरातील वाभाडे काढणे, जातीपातीचे राजकारण, ईडीच्या कारवाया सुरू आहेत. जे इतके दिवस आरोप करत होते ते किरीट सोमय्या स्वतःच गायब आहेत, याचा अर्थ आता लोकांनी बघावं आणि कोण काय आहे याबाबत लोकांनी स्वतः निर्णय घ्यावा.”
दरम्यान, शिवसेना व युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमाने टिटवाळा मंदिर धर्मशाळा येथे महिलांना व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी महिला उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शेकडो महिलांनी सहभाग घेतला. या मेळाव्याला ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ,दीपाली सय्यद, मुंबई सिनेट सदस्य शीतल देवरुखकर,युवा सेना सह सचिव जयेश वाणी यांनी महिलांना मार्गदर्शन केलं.