“संभाजी नव्हे मनोहर भिडे या भयानक विकृत वृत्तीच्या माणसाला…”, मराठी अभिनेत्यानं व्यक्त केला संताप
मुंबई | Sambhaji Bhide – शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं सांगितलं जातं पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं आहे. त्यांनी केलेल्या या धक्कादायक वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. तसंच त्यांच्यावर कारवाई करण्याची देखील मागणी केली जात आहे. यामध्ये आता मराठी अभिनेते किशोर कदम सौमित्र (Kishor Kadam Saumitra) यांनी भिडेंविरोधात फेसबूक पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
किशोर कदम सौमित्र यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “अजित पवारांना उपमुख्यमंत्री करत भिडे वृत्तीच्या माणसांना बोलतं करून अजित पवारांना हतबल करत राहणं हा राजकारणाचा भाग आहे. आपण सगळेच या राजकारणामुळे कोंडीत सापडलो आहोत.”
“आता हा मुद्दा शिंदेजी आणि अजितजी कसे हाताळतात हा नसून माननीय फडणवीसजी या दोघांची मजा बघत बसणार नाहीत अशी अपेक्षा आहे. तसं नसेल तर तात्काळ संभाजी नव्हे मनोहर भिडे या भयानक विकृत वृत्तीच्या माणसाला अटक करावी अशी मी एक कलावंत म्हणून मागणी करत आहे”, असंही किशोर कदम सौमित्र यांनी म्हटलं आहे.