जंगल मे मोर नाचा किसने देखा ?
पुण्याचा पूर ओसरतोय पण गेल्या सप्ताहातील सुरुवातीचे दोन ते तीन दिवस हे पुणेकरांकरिता आणि विशेषतः सिंहगड रोड , एकता नगर या सखल भागातील रहिवाशांकरिता अत्यंत आव्हानात्मक असे होते.
या कालावधीमध्ये पुण्यातील अनेक लोकप्रतिनिधी नगरसेवक आणि समाजसेवकांनी रस्त्यावर उतरून, पूरग्रस्तांना मदत केल्याचे फोटो तसेच त्यांनी केलेल्या मदतीचे आकडे माध्यमांतून झळकले. परंतु, या सगळ्यांमध्ये माध्यमात चर्चा न झालेले अजित पवार यांचे काम अतिशय महत्त्वपूर्ण होते, असा निष्कर्ष काढता येतो.
मुरलीधर मोहोळ :
पुण्यात संततधार पाऊस पडत असल्याचे दिसून येताच, केंद्रीय अर्थसंकल्पाचे अधिवेशन सोडून मंत्री मुरलीधर मोहोळ हे दिल्लीहून, पुण्यामध्ये दाखल झाले. त्यांनी विमानतळावरून थेट एकता नगरमध्ये धाव घेतली. पूरग्रस्तांशी चर्चा केली तेथून ते महापालिकेत गेले. तेथे त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक केली. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. आणि मग रात्री उशिरा ते आपल्या निवासास्थानी परतले.
चंद्रकांत दादा पाटील :
पुराच्या पहिल्या दिवशी दादा पुण्यात आलेच नाहीत. पण दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी पाहणी केली. त्यानंतर शाळा बंद ठेवण्याची महत्त्वपूर्ण सूचना जिल्हा प्रशासनाला केली. पूरग्रस्तांना काही मदत देखील देऊ केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे :
ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना किंवा भाजपाची टीम ‘ ऑन ग्राउंड ‘ काम करते, तसे पुण्यातील एकनाथ शिंदे यांची शिवसेना दिसत नाही. परंतु स्वतः मुख्यमंत्री संवेदनशील असल्याने त्यांनी ट्रक भरून पूरग्रस्तांकरिता मदत पाठवली. तिसऱ्या दिवशी ही मदत पोहोचली. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ही मदत येथे वितरित केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार :
पहिल्यांदा खडकवासलातून 11,000 क्युसेक सोडले तेव्हाच तातडीने दादांनी पुणे गाठले. त्यांनी एकता नगर मध्ये जाऊन औपचारिकपणे पूरग्रस्तांची पाहणी केली. परंतु त्यानंतर जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांना घेऊन त्यांनी जल व्यवस्थापन केले.
स्वतः दादा साडेपाच तास एकाच केबिनमध्ये बसून होते. पाणी किती वाजता सोडायचे विसर्ग किती करायचा ते पाणी किती वाजेपर्यंत पुण्यात पोहोचणार आणि त्याच्या दरम्यानच्या काळात कोणती नागरी वस्ती कशी तातडीने हलवायची, याचे संपूर्ण नियोजन कागदावरती घेऊन दादांनी स्वतः जलसंपदाचे अधिकारी आणि आयुक्तांना समोर बसून, याची अंमलबजावणी करून घेतली.
काल ३० तारखेच्या रात्री देखील पुन्हा पाणी वाढणार असल्याचे लक्षात येतात दादांनी या तिन्ही अधिकाऱ्यांना दूरध्वनीवर घेत पहिल्यांदा नागरी वस्ती हलविण्याचे आणि सक्तीने नागरिकांचे स्थलांतर करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. ते स्वतः या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
तात्पर्य : या संपूर्ण पूर परिस्थितीमध्ये सर्वच लोकप्रतिनिधींच्या संवेदनशीलतेचे दर्शन घडले परंतु ज्या पद्धतीने मोहोळ, पाटील किंवा शिवसेना , भाजपाचे स्वतंत्र जनसंपर्क व पी आर टीम आहे तशी कुठलीही टीम राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादांकडे नाही . प्रत्यक्षात मदत , विचारपूस , सांत्वना , बैठका या सर्वांपेक्षा व्यक्तिशः अजितदादा पवार यांनी ग्राउंड वरती उतरून पूर संरक्षणार्थ सर्वात मोठे आणि नेमके काम केले . परंतु त्याची दखल माध्यमांमधून फारशी घेतली गेली नाही.
अर्धी रात्र आणि पुढचा दीड दिवस सातत्याने पुरावरती काम करून देखील ‘ जंगल मे मोर नाचा , किसी ने ना देखा ‘ अशीच अवस्था झाली असे म्हणता येईल.