एकनाथ शिंदेची माघार? उद्धव ठाकरेंना मागितली टाळी; म्हणाले…”झालं गेलं विसरुन…”

मुंबई : (Eknath Shinde On Uddhav Thackeray) शिवसेनेतील सर्वात एकनिष्ठ आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेल्या एकनाथ शिंदेनी शिवसेनेविरोधात बंडखोरी आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच थेट आव्हान दिलं. आपले राजकीय गुरु आनंद दिघे आहेत, असे सांगत मोठ्या थाटात मिरवणाऱ्या एकनाथ शिंदेंनी ‘गद्दारांना क्षमा नाही’ या त्यांच्या गुरुच्याच विचारांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी तिलांजली वाहत खुद्द गद्दारी केली आणि आपल्या स्वच्छ निष्ठेच्या प्रतिमेवर ‘गद्दारीचे डाग’ ओढावून घेतले.
दरम्यान, त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील आरोप-प्रत्यारोपाचा वाद विकोपाला जाताना दिसत आहे. शिंदे आणि शिवसेना एकत्र यावी यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. याउलट ते दुर कसे जातील याचीच काही नेते मंडळींकडून तजबीज केली जात आहे. मात्र, आज जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने का होईना पण, एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टाळी देण्याचा प्रयत्न केला आहे. मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगळे वाद मिटतात, असं म्हणत मनोमिलनाची तयारी दाखवल्याने हे शिंदेंना उशिरा का होईना सुचलेलं शहाणपण आहे असं म्हणता येईल.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना एकनाथ शिंदे यांनी मैत्री दिवसाच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंना झालं गेलं विसरुन जा, असं अप्रत्यक्षपणे सांगत एकत्र येण्याची साद घातली आहे. मैत्रीसोबत क्षमा जोडली की, सगळे वाद मिटतात पण क्षमा करण्यासाठी मोठं काळीज लागतं, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी मैत्रीचा चेंडू ठाकरेंच्या कोर्टात ढकलला आहे. उद्धव ठकारेंनी ‘पुनश्च हरिओम’ म्हणत मागील अडीच महिन्यांमधल्या घटना विसरुन आवाज द्यावा अशी अपेक्षाच एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्ष बोलून दाखवली आहे. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.