कोल्हापूरचं ठरलं! ‘या’ दोघांमध्ये रंगणार लोकसभेची कुस्ती?

कोल्हापूर : (Kolhapur district itself will change politics) कोल्हापूरच्या लाल मातीची कुस्ती अख्खा महाराष्ट्रानं पाहिली आहे. पण, राजकारणात रंगणाऱ्या निवडणुकांच्या कुस्त्या ह्याही काय कमी नसतात. सध्या झालेल्या सत्तांतरानंतर कोल्हापूरात आगामी लोकसभेत मंडलिकांना मुश्रीफांच्या विरोधात शड्डू ठोकण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीने कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण पूर्ण ३६० अंशानेच फिरल्यानं नवीन समीकरण आता दिसणार आहेत.
मागील लोकसभेत हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी ज्या आमदारांच्या मदतीने प्रा. संजय मंडलिकांनी शिवसेनेच्या तिकीटावर कोल्हापूर लोकसभेचं मैदान सहजपणे मारलं आता त्यांच्याच विरोधात लोकसभेची कुस्ती रंगणार हे मात्र नक्की. आता मात्र जिल्ह्याचं राजकारण अचानक बदललं आहे. ज्या पाटील आणि मुश्रीफ यांच्यामुळं मंडलिक खासदार झाले, त्या दोघांची विनंती धुडकावून त्यांनी बंडखोरीचा झेंडा हातात घेतला. यामुळं आगामी काळात त्यांना या दोघांविरोधात लढाई लढावी लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीला अजून दीड ते पावणे दोन वर्षाचा कालावधी आहे. तोपर्यंत अजून बऱ्याच राजकीय उलथापालथी होतील. यामुळं आज तरी मंडलिक आणि मुश्रीफ यांच्यात लढतीची चर्चा सुरू असली तरी तेव्हा मंडलिकांविरोधात मैदानात कोण उतरणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या तरी जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ आणि पाटील यांच्या विरोधात भाजपची नवी टिम उभी राहणार आहे. ज्यामध्ये महाडिक, मंडलिक यांच्यासह आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे, आबिटकर, नरके, क्षीरसागर, समरजित घाटगे, कुपेकर अशा नेत्यांच्या नव्या गटाचा समावेश असणार आहे.