कोरियन तरुणीसोबत गैरवर्तन करणं पडलं महागात; पिंपरीतून तरुणाला अटक
पिंपरी | शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होत असताना पुण्याच्या संस्कृतीला लाजवेल अशी घटना घडली आहे. एक साऊथ कोरियन तरुणी रस्त्यावर युट्यूब व्हिडिओ बनवत असताना एका तरुणाने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी पाऊले उचलत संबधित तरुणाला तातडीने ताब्यात घेतले आहे. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील एका ठिकाणी कोरियन तरुणी यू ट्यूबसाठी व्हिडिओ बनवत होती. त्यावेळी तिने नारळ पाणी पीत असताना दुकानदाराला सांगतले की, तुला भेटून आनंद झाला. हे बोलल्यावर संबधित दुकानदाराने बाहेर येत तिच्या गळ्यात हात घातला. त्यानंतर ती कैली नावाची तरुणी त्याला नमस्कार करते आणि घटनास्थळावरून निघून जाते. असा व्हिडिओ पहायला मिळत आहे. तिथून बाहेर पडल्यानंतर तिने हा सर्व प्रकार सांगितला आहे. ती म्हणते की, त्या व्यक्तीला मला मिठी मारायची होती. मात्र, वेळीच निघाल्याने हा प्रकार टळला आहे.
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी या घटनेची दखल घेत संबधित दुकानदाराला ताब्यात घेतले असून त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. या घटनेमुळे पुणे पर्यटकांसाठी कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे.