“ललितला फसवलं गेलंय, त्याचा एन्काऊंटर करू नका…”, ललित पाटीलच्या आईची विनंती
मुंबई | Lalit Patil Arrested : गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटीलला (Lalit Patil) अखेर अटक करण्यात आली आहे. ललित पाटीलला चेन्नईमधून अटक करण्यात आली आहे. तर त्याला मुंबईच्या साकीनाका पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
ललित पाटील ससून रूग्णालयातून फरार झाला होता. त्यानंतर त्याला शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी 10 पथकं तयार केली होती. तर आता त्याला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता ललित पाटीलच्या चौकशीत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ललितला अटक झाल्यानंतर त्याच्या आईने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ललितचा एन्काऊंटर न करण्याची विनंती केली.
ललित पाटीलच्या आईने माध्यमांशी संवाद साधताना धक्कादायक खुलासा केला. त्या म्हणाल्या की, पोलिसांनी ललितला अटक केली आहे, त्यामुळे पोलीस जो निर्णय घेतील तो योग्य असेल. पण ललितने असा काय मोठा गुन्हा केला आहे? त्याच्या एन्काऊंटरची काय गरज आहे? जे लोक मोठमोठे गुन्हे करतात ते सुटतात, मग ललितने असं काय केलंय की त्याचा एन्काऊंटर करणार आहेत. तर त्याचा एन्काऊंटर करू नये. कारण त्याच्या मागे आई-वडील, दोन मुलं आहेत.
ललितला फसवलं गेलंय, त्यामुळे त्याने त्याबाबत सांगावं. तसंच त्याला जी शिक्षा मिळेल ती त्याने भोगावी. त्याला मुंबई पोलिसांनी पकडलं आहे, त्यामुळे तो घाबरला असेल. पण त्यानं पोलिसांना सहकार्य करावं. तसंच त्याला फसवलं गेलंय, पैशासाठी त्याला टॉर्चर केलं जात होतं. त्यामुळे त्यानं पलायन केलं, हे त्यानं सागावं, असं ललितची आई म्हणाली.
ललितच्या एन्काऊंटरची भाषा करणं चुकीचं आहे. राजकारणातील नेते, पोलिसही तेच म्हणत आहेत. त्यानं नेमका असा काय गुन्हा केला आहे? ललितचं हार्नियाचं ऑपरेशन होणार होतं त्यासाठी त्याला चेकअपला नेलं जात असताना डॉक्टर म्हणाले की, आज तुझं ऑपरेशन केलं आणि उद्या तुला तुरूंगात नेलं तर तू जगू शकणार नाही. त्यामुळे ललित तिथून पळून गेला होता, असा दावा ललितच्या आईनं केला आहे.