थेरगाव रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयातील पाण्याच्या फिल्टरमध्ये आळ्या आढळल्या आहेत. त्यामुळे दिशा एंटरपायजेसला काळ्या यादीत टाकण्याची मागणी रविराज काळे यांनी केली आहे. रुग्णालयात येणार रुग्ण, नातेवाईक दररोज फिल्टरचे पाणी स्वच्छ आहे म्हणून पितात. पण, त्याच पाण्यात अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शंभर खाटाचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण, त्यांचे नातेवाईक, नागरिक औषधोपचार घेण्यास येत असतात. थेरगाव रुग्णालयात चैतन्य शिंदे हे आजारी असल्याने ते अॅडमिट आहेत. त्यांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी त्याच्या पत्नी अलका ह्या रुग्णालय तळमजल्यावर गेल्या होत्या. तेथील पिण्याच्या पाण्याचे फिल्टरमधून त्यांनी बाटलीमध्ये पाणी घेतले. पण, बाटली भरल्यानंतर त्यांना त्या पाण्यात अळ्या असल्याचे दिसून आले. संबंधित रुग्णालय प्रशासनाला याबाबत तात्काळ कल्पना देऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यास सांगितले. त्यांनी त्वरित दिशा इंटरप्राईजेस यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. आरोग्य विभागाकडून दहा हजार रुपयांचा दंड देखील करण्यात आला.
नियमानुसार प्रत्येक आठ दिवसांमध्ये दोन वेळा थेरगाव रूग्णालयात असणारे सर्व फिल्टर्स हे साफ करणे बंधनकारक असते. जर त्या पाण्यामध्ये आळ्या आढळून येतात तर ठेकेदाराकडून कामात हलकर्जीपणा केला गेला आहे.त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पार्टीचे रविराज काळे यांनी केली आहे। आळ्या असलेली पाण्याची बॉटल सोमवारी आयुक्तांना भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.