
पुणे : २२ वर्षांच्या लष्कराच्या सेवेनंतर पहिल्याच प्रयत्नात आयएएस उत्तीर्ण होणाऱ्या लेफ्टनंट कर्नल अमोल आवटे यांचा सत्कार पुण्यात रविवारी करण्यात आला. गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज आणि आवटे कुटुंबीय यांच्या वतीने हा सोहळा पंडित नेहरू सांस्कृतिक सभागृह (घोले रस्ता) येथे २१ ऑगस्ट रोजी झाला. माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडल संस्थेचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते आणि लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सुदर्शन हसबनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार झाला. मिलिंद कुलकर्णी, मकरंद केळकर यांनी अमोल आवटे यांची मुलाखत घेऊन संवाद साधला.
लोकाभिमुख प्रशासनाचे कर्तव्य मानणारे अमोलसारखे युवक ही राष्ट्राची संपत्ती आहे. चारित्र्य, समर्पण आणि उत्तरदायित्वाच्या भावनेने प्रशासनात युवक आले तर देशाचे चित्र बदलले जाईल. अमोल आवटे यांचे यश हे युवकांना प्रेरणादायी आहे. ते प्रशासकीय सेवेत उत्तम कारकीर्द करतील, यात शंका नाही. हा नेतृत्वाचा आशादायक प्रवास आहे.
— अविनाश धर्माधिकारी, चाणक्य मंडल संस्थेचे संस्थापक
अमोल आवटे म्हणाले, ‘वडिलांच्या नोकरीमुळे राज्यभर अनेक ठिकाणी शिक्षण पूर्ण केले. एनसीसीमधील ३ वर्षांनी प्रेरणा दिली. तिथे रिपब्लिक डेच्या परेडसाठी मी निवडलो गेलो होतो. बेस्ट कँडिडेट म्हणून मी निवडलो गेलो होतो. त्या प्रेरणेतून मी सैन्यात दाखल झालो. राष्ट्रीय रायफल्समध्ये प्रशिक्षण झाले. राजस्थान, पंजाब, काश्मीर येथे सैन्यदलातील कारवाया, तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून कांगो येथे शांतीसेनेतील कार्यात सहभाग घेतला. अतिरेकी कारवायांवर नियंत्रण मिळविताना पायाला गंभीर दुखापत झाली.आंतरराष्ट्रीय संयुक्त सैन्य कारवाईत काम करणे, ही शिकण्याची मोठी संधी असते.
देशसेवा सैन्यात केल्याने जो अनुभव मिळाला, त्याचा उपयोग प्रशासकीय सेवेत करण्यात होणार आहे. सैन्यात प्रत्येक पायरीवर स्वतःला सिद्ध करावे लागते, अभ्यास करावा लागतो. जिद्द, परिश्रमाची तयारी लागते. प्रशासकीय सेवेत टीम वर्कला भर देणार आहे.आयएएस हेच ध्येय ठेवून मी अभ्यास केला.
भूगोल विषय घेऊन मी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. स्वतः नोटस् काढण्यावर भर दिला. नव्या विद्यार्थ्यांनी चालू घडामोडींवर भर द्यावा. तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. माझ्या परीक्षेच्या तयारीच्या दिवसात कुटुंबाचे सहकार्य मिळाले, लष्करी सेवा आणि प्रशासकीय सेवांमधील साम्यस्थळांबद्दल अविनाश धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केले, असेही त्यांनी
सांगितले.
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सुदर्शन हसबनीस म्हणाले, ‘अमोल आवटे यांचा प्रवास हा उत्कृष्ट सैन्याधिकाऱ्याचा प्रवास आहे. ‘लीड फ्रॉम फ्रंट’ हा सैन्याचा संदेश घेऊन ते कार्यरत आहेत.’