“सरकार पडणं म्हणजे भूलथापा, मविआचं सरकार असतं तर…”; विरोधकांच्या दाव्यावरून बच्चू कडूंची प्रतिक्रिया

मुंबई : (Maharashtra Politics – Bacchu Kadu) ‘शिंदे फडणवीस सरकार मध्ये अंतर्गत वाद सुरु आहे. अवैधरित्या स्थापन झालेले हे सरकार लवकरच पडणार असून काही दिवसांत मध्यावधी निवडणुका होतील.’ असा दावा महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केला जात आहे. यावर यात काहीही तथ्य नसून महाविकास आघाडीतील उरलेले आमदार शिंदे गटात जाऊ नयेत यासाठी असे दावे केले जात असल्याचं सरकारमधील नेत्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणात माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“शिंदे फडणवीस सरकार पडेल असं म्हणनं भूलथापा आहेत. महाविकास आघाडीचं सरकार असतं तर हेही दोन महिन्यात पडेल असं आम्हीही म्हणालो असतो. मग त्यावर तुम्ही विश्वास ठेवणार का?” अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. “त्यांचे आमदार फुटून आमच्यात आले नाही पाहिजेत म्हणून असं बोलल्या जात आहे. जेणेकरून आपलंच सरकार स्थापन होणार आहे तिकडं कशाला चालला असं म्हणता येतं.” असा टोला त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या दाव्यावर केला आहे.
दरम्यान, याच दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये अत्यंत अस्वस्थता आहे. २०२४ मध्ये त्यांना उमेदवार मिळणं देखील कठीण होईल. त्यामुळे ते निवडून येण्याचा संबंधच येत नाही. उद्धव ठाकरे तर संपूर्ण राष्ट्रवादीच्या जीवावर बसलेले आहेत. त्याचं काहीही राहिलेलं नाहीये.” अशी प्रतिक्रियाबावनकुळे यांनी दिली आहे.