आरोग्यराष्ट्रसंचार कनेक्ट

मेंदूला अचूक विचाराची सवय लावूया

-अशोक सोनवणे, सायकोलॉजिस्ट तथा ब्रेन प्रोग्रामिंग ट्रेनर

आपल्याला आपल्या शेजारी, कार्यालयात, व्यवसायात, समाजात अशा अनेक व्यक्ती दिसत असतील की, त्या नेहमी हसत असतात, प्रसन्न असतात, त्यांच्यावर ताणताणाव अजिबात येत नाही, भविष्याची ते जास्त काळजी करीत नसतात. कोणतेही काम सकारात्मक मानसिकतेने स्वीकारतात, त्यांच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक उर्जा सळसळून वाहत असते. त्यामुळे त्यांचे कौटुंबिक, कार्यालयीन, व्यावसायिक आणि समाजिक संबंध खूप मधुर असतात. त्यांचा सर्वच ठिकाणी प्रभाव अधिक असतो. तर याच्या विरुद्ध मानसिकतेचे सुद्धा अनेक व्यक्ती तुम्हाला दिसत असतील, दुसऱ्याच्या व्यक्तिमत्वावर, दुसऱ्याच्या कार्यशैलीवर, दुसऱ्याच्या सवयीवर त्यांच्या मागे नकारार्थी चर्चा करणे, चुका शोधत बसणे, स्वतः चिडचिड करणे, नकारार्थी विचार करीत राहणे, कोणतेही काम करताना कसेतरी पूर्ण करायचे असे समजून पूर्ण करणे, स्वतःचे गाऱ्हाणे किंवा स्तुती सतत करीत राहणे अशा विकृत मानसिकतेचे सुद्धा तुम्हाला दिसत असतीलच.

आपल्या मेंदूला जशी विचार करायची सवय लावली त्यानुसार मेंदू काम करतो. ते बरोबर की चूक हे मेंदूला समजत नसते. तुम्ही यापूर्वी जसे विचार केले, तेच विचार तुमच्या अंतर्मनात जमा झालेले आहेत. त्यामुळे तुमचे विचार आता सहज अंतर्मनातून तयार होतात. परंतु आपले बाह्यमन चांगले वाईट, चूक की बरोबर याचा निवाडा करीत असते. त्यामुळे आपण बाह्यमनावर काम करून मेंदूला जे पाहिजे ते विचार करण्याची सवय लावू शकतो. मग मित्रानो आपण आपल्या मेंदूला विचार करायची कशी सवय लावत आहोत याचा विचार करावा लागेल.

आपली मुलं लहान असतात, ते कुटुंबाचे, शेजाऱ्यांचे, मित्रांचे अनुकरण करीत असतात. त्यातूनच त्यांच्या विचारांची निर्मिती होत असते. मग हेच विचार अंतर्मनात जात असतात. आपल्या बाबतीत सुद्धा हेच झाले आहे, आपण आज जे आहोत ते आपल्या विचारामुळेच, आपले आरोग्य, आर्थिक प्रगती, नातेसंबंध, आपला प्रभाव, आपले व्यक्तिमत्व हे आपल्या अंतर्मनातील विचारामुळे घडलेले आहे. आपले आताही चुकीचे विचार काढून चांगले विचार अंतर्मनात रुजवू शकतो. तसेच आपल्या मुलांच्या अंतर्मनाला विशिष्ट विचारांची सवय लावू शकतो.

आपले स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्यातून शारीरिक स्वास्थ्य निर्माण होत असते. मग आपल्या कुटुंबाच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य निर्मितीसाठी कुटुंबप्रमुख म्हणून आपण कोणती जबाबदारी निभावावी. कुटुंबाच्या अंतर्मनात कोणत्या गोष्टी रुजवाव्यात, आणि कोणत्या गोष्टी काढून टाकाव्यात याचा विचार करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये