नुपूर शर्मावरील ताशेऱ्यानंतर सुप्रीम कोर्टाविरोधात ११७ मान्यवरांकडून पत्र

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर कठोर ताशेरे ओढले होते. मात्र नुपूर शर्मा यांना आता समर्थन मिळताना दिसत आहे. सुप्रीम कोर्टाच्या नुपूर शर्मावरील ताशेऱ्यांविरोधात ११७ दिग्गज लोकांनी पत्र प्रसिद्ध करत टीका केली आहे.
टीका करणाऱ्यांमध्ये १५ निवृत्त न्यायाधीश, ७७ निवृत्त नोकरशहा आणि २५ निवृत्त लष्कर अधिकारी यांचा सहभाग आहे. सुप्रीम कोर्टाने ओढलेले ताशेरे हे अपमानकारक असल्याचं या मान्यवरांकडून म्हटल जात आहे. सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांनी मोहम्मद प्रेषितांबाबत बेलगाम वक्तव्य केल्यानं देशात अशांतता पसरली आहे. नुपूर शर्मा यांनी देशाची माफी मागायला हवी असं सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलं होतं. वादग्रस्त वक्तव्यानंतर नुपूर शर्मा यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यावर सुप्रीम कोर्टानं सुनावलं होतं. मात्र त्यांचं वक्तव्य अंतिम आदेशाचा भाग नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
पत्राद्वारे मान्यवरांकडून सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यांबाबत म्हटलं आहे की, देशात जे काही सुरु आहे ते नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळं म्हणणे हे उदयपुर येथे यथील निर्घृण हत्या करणाऱ्या गुन्हेगारांची आभासी मुक्तता करण्यासारखं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. न्यायमूर्तींनी केलेली टिपण्णी ही दुर्दैवी असून न्यायिक तत्वांशी सुसंगत नाही. न्यायधीशांच्या निरीक्षणाचा आणि याचिकेत उपस्थित मुद्द्यांचा काही संबंध नसल्याचं आणि नुपूर शर्मा यांना न्याय नाकारण्यात आला असल्याचंही पत्रात म्हणण्यात आलं आहे.