छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणखी एका मोहऱ्याची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर

मुंबई | Chatrapati Shivaji Maharaj – सध्या मराठी चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहेत. यामध्ये मराठीतील ऐतिहासिक चित्रपट बॅाक्स ऑफीसवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. आता आणखी एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शूर मावळ्यांनी जीवाची बाजी लावत इतिहास घडवला आहे. या मावळ्यांपैकीच निष्ठावंत मावळा म्हणजे मुरारबाजी देशपांडे. आता नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा रुपेरी पडदयावर साकारण्यात येणार आहे.
काही दिवसांआधी प्रदर्शित झालेल्या ‘फत्तेशिकस्त’ तसेच ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या भरघोस यशानंतर आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी ‘वीर मुरारबाजी…पुरंदरची युद्धगाथा’ चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे.
दरम्यान, १६६५मध्ये मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार असलेले मुरारबाजी देशपांडे निवडक सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेले. यादरम्यान नेमकं काय घडलं? मुरारबाजी यांनी मुघलांशी कशाप्रकारे दोन हात केले? हे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.