बॅनर्जी व कोंढरे यांना लोकनेते भाई वैद्य युवानेता पुरस्कार जाहीर

पुणे : भाई वैद्य फाउंडेशनतर्फे भाई वैद्य यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा लोकनेते भाई वैद्य युवानेता हा राष्ट्रीय पुरस्कार प. बंगालमधील समाजवादी युवानेत्या सागरिका बॅनर्जी यांना आणि कुर्डूवाडी, सोलापूर येथील आंतरभारती विद्यालयातील सहशिक्षिका समता दळवी-कोंढरे यांना प्राचार्या नलिनीताई वैद्य समाजाभिमुख शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
येत्या २२ जून २०२२ रोजी भाई वैद्य यांच्या ९४ व्या जयंतीदिनी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, असे भाई वैद्य फाउंडेशनच्या सचिव प्रा. डॉ. गीतांजली वैद्य यांनी कळविले आहे. प्रत्येकी रोख दहा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार प्रदान समारंभ बुधवारी (दि. २२) सायंकाळी ५.०० वाजता, एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे कष्टकर्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांच्या उपस्थितीत आणि भाई वैद्य फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. हा कार्यक्रम भाई वैद्य फाउंडेशन, आरोग्य सेना, एस. एम. जोशी मेमोरियल मेडिकल असोसिएशन, सहृदय, जनलोक मेडिकल्स, जनलोक डायग्नॉस्टिक सेंटर, स्मिता पाटील आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा आणि सोशॅलिस्ट पार्टी (इंडिया) या सर्व संघटना आणि संस्थांच्या वतीने आयोजिण्यात आला आहे.
सागरिका बॅनर्जी कोलकाता येथील असून श्रीमती समता दळवी-कोंढरे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील आहेत.



