सत्ता घालवली; पुढे काय?

भाबडेपणा आणि बावळटपणा यात नक्कीच फरक असतो. हा भेद समजून घेणे आवश्यक आहे, कारण यातले अंतर व्यक्तिसापेक्ष आहे. आता अशा भाबड्या भ्रमात राहाणे राजकारणाच्या दृष्टीने फारसे लाभदायक नाही. महामारी आणि वैयक्तिक आजारपण यांचा विचार केला आणि समाजकारण, आरोग्य याबाबत जगात क्रमांक एकचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना मान्यता दिली तरी आपल्याबरोबरचे पन्नास आणि पक्षातले सुमारे ३८ आमदार आपल्याला सोडून जातात हे जास्त विचार करण्यासारखे आहे.
अत्यंत अनपेक्षितपणे महाराष्ट ्रराज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाली. ही निवड धक्कादायक, तसेच समग्र राजकारणावर परिणाम करणारी आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार जेव्हा हा सगळा प्रकार आपल्याला धक्कादायक आहे असे सांगतात तेव्हा जे घडले ते किती काळजीपूर्वक आणि गोपनीय होते हे समजून येईल. धक्कातंत्राचा हा अफाट आविष्कार होता. त्यापुढे विरोधी पक्ष किती हतबल झाला हे लक्षात येते. खुद्द उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना यावर थेट प्रतिक्रिया देता आली नाही. त्यातून शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात जे भाषण केले ते त्यांच्या पायउतार होताना केलेल्या भाषणाच्या अगदी टोकाचे होते. वारंवार अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीचा दाखला देत मनातली, सत्ता गेल्याची सल बोलून दाखवण्यात आणि फुटलेल्या आमदारांवर रोष व्यक्त करण्यात आता काय हशील आहे हे समजत नाही. खरेतर दुसर्या वृत्तपत्रातील अग्रलेखावर आपल्या वृत्तपत्रात अग्रलेख लिहिण्याचे काही कारण नसते. तसा शिरस्ताही नाही. मात्र शिवसेनेचे मुखपत्र हे शिवसेनाप्रमुखांचा विचार असतो. त्यातला अग्रलेख हे शिवसेनाप्रमुखांचे विचार असतात अशी मान्यता आहे.
साहजिकच ते विचार प्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांचे किती असतील याबाबत प्रश्नचिन्ह लागत असले तरी शिवसेनेचा प्रवक्ता अग्रलेख लिहीत असल्याने वैचारिक आदानप्रदानाची शक्यता धुसर होते. असे म्हणायचे कारण की, दररोज सकाळी शिवसेनेची भूमिका ते मांडत असल्याने वेगळे काय वाचायला मिळणार असा मुद्दा असतोच. तर शुक्रवारी शिवसेनाप्रमुखांनी सत्ता मिळवली; पुढे काय? असा विचारप्रचुर अग्रलेख लिहिला आहे. खरेतर सत्ता घालवली; पुढे काय? असा आत्मचिंतनपर अग्रलेख लिहिणे आवश्यक होते. खरेतर सत्ता मिळाली की, कामाला सुरुवात होते. सत्तारूढ कोणीही असो, त्याला सत्ता मिळाल्यावर काम करावेच लागते. एकनाथ शिंदे यांनी सत्तारूढ होताच मुखपत्रातल्या लेखाला कृतीने उत्तर दिले आहे. मेट्रो कारशेडचा मुद्दा पहिल्या क्रमांकावर घेत रखडलेल्या कामाला दमदार प्रारंभ करणार असल्याचे दाखवून दिले. पावसामुळे बेहाल झालेल्या मुंबईकरांना रस्त्यावर चालण्याचे स्वास्थ्य मिळावे यासाठी कामाला प्रारंभ करीत आपत्कालीन बैठकही घेण्यात आली. मुळात आता दर पावसाळ्यात होणारी जलकोंडी आणि त्रासलेल्या नागरिकांना मोटरसायकलवरून बोटीचा आनंद घेण्याच्या प्रकाराला पायबंद घालण्याचा पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला पाहिजे. एप्रिल, मे महिन्यात नाले सफाई, गटार सफाई आणि नदी सफाई अभियान राबवले जाते. महापालिकेचे करोडो रुपये खर्च केले जातात, मात्र परिस्थिती ये रे माझ्या मागल्या सारखीच असते. सच्चा शिवसैनिक आता काय करतो हे दिसेल.
खरेतर सत्तारूढ पक्षाला आव्हानात जगावे लागते. आव्हाने ही पाठपुरावा करीत असतात. मात्र सत्तेतून बाहेर पडलेली मंडळी खरेतर आत्मपरीक्षण करतात किंवा पराभूत मनोवृत्ती असेल तर माघार घेतात. खचून न जाता हिमतीने कामाला लागणे हे शिवसेनेच्या भाषेत खर्या मावळ्याचे, मर्दाचे लक्षण आहे. हे सामोरे यावे, येईल हेच अपेक्षित आहे. भावनिक आवाहन आणि भाबडेपणा हा राजकारणात फार काळ टिकत नाही. भाबडेपणा आणि बावळटपणा यात नक्कीच फरक असतो. हा भेद समजून घेणे आवश्यक आहे, कारण यातले अंतर व्यक्तिसापेक्ष आहे. आता अशा भाबड्या भ्रमात राहाणे राजकारणाच्या दृष्टीने फारसे लाभदायक नाही. महामारी आणि वैयक्तिक आजारपण यांचा विचार केला आणि समाजकारण, आरोग्य याबाबत जगात क्रमांक एकचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना मान्यता दिली तरी आपल्याबरोबरचे पन्नास आणि पक्षातले सुमारे ३८ आमदार आपल्याला सोडून जातात याकडे ते कसे पाहातात हे जास्त विचार करण्यासारखे आहे. सत्ता गेल्यावर उरलेले आमदार आपल्याला सोडून जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. भेटीगाठी आणि माझ्यासमोर या आणि बोला या बोलण्याला आता अर्थ नाही. आता सत्ता गेल्यावर असे बोलण्याला वेळच वेळ आहे. शिवसेनेची बांधणी करणे हा मुख्य मुद्दा त्यांच्यापुढे आहे. सत्ता गमावल्यावर पराभूत नेहमी तत्त्वज्ञान सांगतात. विजयी नेहमी आपले कायदे आचरतो. आता सत्तारूढ काय करणार यापेक्षा सत्ता मिळवली याचे शल्य शिवसेना प्रमुखांना नक्कीच असेल ती पण आपल्या नकत हा भाग अधिक त्रासदायक आहे.