विरक्त प्रचारकाची अखेर
मदन दास देवी यांचे संपूर्ण आयुष्य हिंदू विचारधारेचा प्रचार करण्यात तर गेलेच परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक बिनीचे शिलेदार म्हणून त्यांनी मोलाची भूमिका बजावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखेरच्या शिलेदाराला भावपूर्ण श्रद्धांजली.
एक पर्व होते, ज्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक स्वतःसाठी विरक्त आणि जनविकासासाठी व्यापक लोकहितासाठी कमालीचे आसुसलेल्या प्रवृत्तीचे होते. जनहित आणि हिंदूमय विचारधारेचा प्रचार हे एक अखंड ध्येय डोळ्यासमोर ठेवून या पर्वातील मंडळींनी त्यांचे आयुष्य वेचले. मदन दास देवी हे या पर्वाचे अखेरचे शिलेदार मानले गेले पाहिजेत. स्वतःसाठी विरक्त असलेल्या या प्रचारांची पिढी आता हळूहळू संपत आहे. त्यातील हे शेवटचे दंडधारी. मदन दास देवी यांचे संपूर्ण आयुष्य हिंदू विचारधारेचा प्रचार करण्यात तर गेलेच परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक बिनीचे शिलेदार म्हणून त्यांनी मोलाची भूमिका बजावली. केवळ संघ कार्यामध्ये ते उत्तरार्धात प्रवेश करते झाले नाहीत तर विद्यार्थी दशेपासून त्यांनी हे संघकारी हाती घेतले. विद्यार्थी परिषद जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मूळ शाखा आहे, त्यातून त्यांनी संघाच्या विचारसरणीमध्ये योगदान दिले.
विद्यार्थीदशेपासूनच संघनिष्ठ कार्यकर्ता घडावा, तो राष्ट्रधर्मी व्हावा, राष्ट्रप्रेमी व्हावा आणि राष्ट्र विकास हाच ध्यास असावा, हे शिक्षण विद्यार्थी परिषदेमध्ये दिले जाते. शालेय शिक्षणाच्या बरोबरीने राष्ट्र विकासाचा मूलमंत्र रोपण करण्याचे काम याच कोवळ्या वयामध्ये केले जाते आणि ते सर्वांत आव्हानात्मक आहे, जे वय अनेक भौतिक सुख सुविधांनी आणि भुलभुलयांनी आकर्षिले जाते, अशा वयामध्ये या सर्व भौतिकतेला मायावाद ठरवून त्यांना दूर सारणे आणि व्यापक राष्ट्रहिताच्या ध्येयाने मन उत्साहित करणे, ही सर्वांत मोठी परीक्षा असते. आणि तेच सर्वांत मोठे आव्हान आहे. मदन दास देवी यांनी हे आव्हान पेलले. म्हणून आज भारतीय जनता पक्षाच्या सुशील आणि चारित्र्यसंपन्न मंत्र्यांची जी वर्गवारी दिसते ती त्यांचीच उपलब्धता आहे, असे म्हणता येईल.
अरूण जेटली, अनंत कुमार, सुशील मोदी, शिवराजसिंग चव्हाण, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे अशा अनेक भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्याकडून समाजकार्य संघटनेचे काम शिकून घेतले. नितीन गडकरींसारखे नेतृत्व देखील त्यांनी घडविले. बदलत्या प्रवाहामध्ये भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती ही संघापासून थोडी फारकत घेत आहे. सत्तेला शीर्षस्थ मानून भाजप तिकडे झुकत आहे. त्यामुळे हळूहळू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव कमी होतो की काय, अशी एक शंका येत आहे. परंतु, यात देखील संघाचे विचारवंत, प्रचारक आणि आदर्शवत असलेले नेते भाजपामध्ये असल्यामुळे थोडेफार संघीय काम आणि राष्ट्र चरित्राचा उद्गोष चालू आहे. ही पिढी घडवण्यामध्ये मदन दास यांचा खूप महत्त्वपूर्ण सहभाग होता. आज पुण्यामध्ये त्यांचे अंत्यसंस्कार होत असताना भारतीय जनता पक्षाचे नेते, अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित राहत आहेत, हे देखील उल्लेखनीय आहे.
आपण ज्या विचार प्रवाहातून पुढे आलो, ज्या आदर्शमधून पुढे आलो, त्यांच्याप्रति आपली कृतज्ञता ही शेवटच्या श्वासापर्यंत असते, किंबहुना त्यांचे श्वास शमल्यानंतर देखील ही कृतज्ञता असते, हेच आपले चारित्र्य आणि हीच आपली ओळख आहे. कोणत्याही पदावर आपण असलो तरी देखील प्रचारकाचे अस्तित्व हे आपल्याकरिता फार मोठे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचे जुने प्रचारक किंबहुना जुन्या काळातील प्रचारकांची शिकवण ही एकमेव आस या अखंड आणि स्वतंत्र हिंदुस्थानचे स्वप्न पाहणाऱ्या जनतेचे आहे. या पिढीने केवळ संघ घडवला नाही तर संघामध्ये एक कर्तृत्ववान आणि राष्ट्रनिष्ठ पिढी घडवली आहे. जी पिढी या सर्वांना मार्गदर्शन करीत आहे. दुर्दैवाने या पिढीतील असे शिलेदार पुन्हा होणे नाहीत. त्यामुळे या पिढीतील शिलेदार चिरंतन रहावेत आणि सातत्याने मार्गदर्शन करत राहावे, अशी अपेक्षा असते. नियतीच्या चक्रापुढे कुणाचे काही चालत नाही. शेवटी वय झाले की, त्याला थांबावेच लागते. परंतु, त्यांची शिकवण आणि कर्तबगारी हीच आम्हाला दीपस्तंभ म्हणून पुढे राहील, यात कुठलाही संदेह नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखेरच्या शिलेदाराला भावपूर्ण श्रद्धांजली.