महापारेषणची तब्बल २ हजार ५४१ पदांसाठीची भरती अचानक रद्द!

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणने विविध संवर्गातील एकूण २ हजार ५४१ पदांच्या भरतीसाठी जाहीर केलेली परीक्षा अचानक रद्द केली आहे. गेल्यावर्षी ही भरती जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर वेगवेगळ्या पदांसाठी जवळपास ८० टक्के परीक्षा प्रकि‘या पूर्ण झालेली असताना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अचानक ही परीक्षा रद्द केल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, मात्र त्यांचे समाधान झालेले नाही.
गेल्यावर्षी ऑटोबर महिन्यात महापारेषणच्या २ हजार ५४१ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार मोठ्या संख्येने इच्छुक पात्र उमेदवारांनी १० डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज केले होते. दरम्यान आरक्षण स्थितीची पुनर्गणना केल्यानंतर, कंपनीकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे कंपनीचे स्पष्ट केले आहे. मात्र ही आपली फसवणूक असल्याची भावना परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता (दूरसंचार), सहाय्यक अभियंता या पदांसाठी ४ ऑटोबर २०२३ रोजी भरतीची जाहिरात देण्यात आली होती. तर वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), विद्युत सहाय्यक (पारेषण, कंत्राटी) यासाठी २० नोव्हेंबर २०२३, सहाय्यक अभियंता पदासाठी १९ जानेवारी २०२४ व वरिष्ठ तंत्रज्ञ या पदासाठी ३१ जानेवारी २०२४ रोजी भरतीची जाहिरात देण्यात आली होती.
दरम्यान, ऐनवेळी भरती प्रकि‘या रद्द करण्यात आल्यामुळे परिक्षार्थी विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे आता सरकार यावर काय भूमिका घेणार? यावर काही तोडगा काढला जाणार का? तोडगा काढलाच तर तो काय असेल? असे प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले जात आहेत.
2 Comments