यशवंत सुरू करण्यासाठीचे मिशन, व्हिजन व नियोजन आमच्याकडेच – महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर
लोणी काळभोर | निवडणूक जाहीर झाल्यापासूनच निवडणूक बिनविरोध व्हावी या दृष्टीने ज्येष्ठ नेते माधव आण्णा काळाभोर, दिलीप काळभोर सुरेश अण्णा घुले, महादेवराव कांचन व आम्ही सर्व मंडळींनी पुढाकार घेतला. राजकीय मतभेद असताना सुद्धा विरोधी गटाला बैठकांना बोलून बिनविरोध निवडणूकीसाठी अथक परिश्रम घेतले. परंतु काही राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उतावळी झालेल्या मंडळींनी या प्रयत्नांना खो घातला. राज्य व केंद्र सरकारच्या मदतीने यशवंतला जास्तीत जास्त मदत घेण्यासाठी अथक प्रयत्न करणार आहोत. या कामी देशाचे सहकार मंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्यामार्फत प्रयत्न करणार.
नुकतेच केंद्र सरकारने देशभरातील 33 सहकारी साखर कारखान्यांच्या 1378 कोटी थकित कर्जाची पुनर्रचना करण्याची मान्यता दिली आहे. त्यातील 619 कोटींचे व्याज पूर्णपणे माफ केलेले आहे. पैकी महाराष्ट्रातील 20 कारखान्यांचे 861 कोटी रुपये कर्ज पुनर्बांधणी केली जाणार आहे. याच धरतीवर केंद्र व राज्य सरकारची मदत घेऊन यशवंत सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. ज्येष्ठ नेते माधव काळभोर यांनी सांगितल्याप्रमाणेच यशवंत सहकारी कारखान्याची एकही इंच जमीन न विकता राज्य व केंद्र शासनाच्या मदतीच्या आधारे कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यासाठी पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची मदत घेण्याचाही पर्याय उपलब्ध आहे.
जुने युनिट दुरुस्त करने किंवा प्रतिदिन 2000 मे. टनाचे नवीन युनिट उभारण्याचे नियोजन आहे. कामगारांचे थकलेले वेतन व शेतकऱ्यांची प्रलंबित ऊस बिल देणे, ऊसतोड वाहतूकदारांचे थकलेले पैसे पूर्ण करणे ही आमची प्राथमिकता राहील. मयत सभासदांची वारसांची नोंद करून सभासदांच्या मुलांसाठी विविध योजना राबविणे व नावाने यशवंत असणाऱ्या आपल्या यशवंत कारखान्याला पुन्हा गत वैभव प्राप्त करून द्यायचे आहे. विरोधकांनी प्रचार सभांमध्ये टीका करण्यावर भर दिला असून रयत सहकार पॅनलने कारखाना सुरू करण्यावर भर देत त्याचे नियोजन आखले आहे. पॅनल ची रचना करताना 90% तरुण, सुशिक्षित व सहकाराची जान असणारी मंडळी व 10 टक्के सहकारातला अनुभव असणारी मंडळी असे समीकरण करून सर्वपक्षीय उमेदवारांचा पॅनल तयार केला आहे.