हवामानात मोठे बदल! देशात थंडीची चाहूल, तर राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Monsoon News : तिथं देशातून (Monsoon) मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झालेला असताना इथं महाराष्ट्रातूनही येत्या काही दिवसांमध्ये पाऊस परतीची वाट धरताना दिसणार आहे. पण, तत्पूर्वी राज्यातील बहुतांश भागांमध्ये मात्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
बळीराजासाठी ही चांगली बातमी असून, राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशय क्षेत्रांमध्येसुद्धा पाणीपातळी समाधानकारक असल्यामुळं यंत्रणांवरील ताणही कमी होताना दिसणार आहे.
पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या कोकण (Konkan) आणि विदर्भात (Vidarbha) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, पुढच्या 48 तासांमध्ये मुंबई, पुणे आणि ठाण्यामध्ये मधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसणार अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
तर देशात मात्र, दिल्ली, राजस्थान, हिमाचल, हरियाणा, उत्तराखंडमधून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे. तर, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेशच्या विविध भागांमधूनही मान्सूननं काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं देशाच्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीची चाहूल लागत आहे.
त्यामुळे येत्या काळात देशाच्या उत्तरेकडील थंडीची ही चाहूल महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार असल्यामुळं हवामानात मोठे बदल होताना दिवस आहेत.