दादा खुशाल, शिंदे पेचात; फडणवीस संधीच्या शोधात
अंतर्गत स्पर्धेच्या रेट्यात रखडला विस्तार
पुणे | Maharashtra Politics – राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होतोय, याच्या प्रतीक्षेत अनेक सत्ताधारी आमदार आहेत. इच्छुक आमदारांची समजूत घालताना मुख्यमंत्र्यांसह अनेक वरिष्ठ नेते मेटाकुटीला आले आहेत. मंत्रिपदाचा ध्यास लागलेल्या इच्छुकांचे समाधान करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार बावनकुळे यांनी सांगितले की, नागपूर विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वी नवे मंत्री नेमले जावेत, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. बावनकुळे यांनी हे विधान करून मंत्रिमंडळ विस्ताराचा चेंडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात टाकला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थक आमदार भरत गोगावले यांचे एक विधान सध्या चर्चेत आहे. मंत्रिपदासाठी स्वतः गोगावले इच्छुक आहेतच. मंत्रिपद मिळाले नाही तर, बायको आत्महत्या करेल, असे सांगणाऱ्या एकाला मंत्रिपद मिळाले आहे. तर, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे स्थानिक राजकारणात मला संपवून टाकतील, म्हणून तरी मला मंत्रिपद द्या, अशी भीती व्यक्त करत अजून एकाने मंत्रिपद मिळविले आहे. अशा आशयाची विधाने आमदार गोगावले यांनी केली. त्यांचा रोख शिंदे गटातील आमदार मंत्र्यांवरच होता हे उघड आहे. पूर्वी अर्धी भाकरी आमच्या वाट्याला होती. अजित पवार गट आल्याने चतकोर भाकरीच वाट्याला आली आहे, ती तरी मिळावी, अशी मागणी गोगावले यांनी शिंदे गटाच्या इच्छुकांच्या वतीने केली आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आठ आमदारांना घेऊन अजित पवार आले आणि त्यांच्यासह नऊही जणांना मंत्रिपदे मिळाली. लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी मोदी-शहा यांनी बेरजेचे राजकारण केले. पण, भाजप आणि शिंदे गटातील इच्छुकांना हे राजकारण रूचलेले नाही. परंतु, याबाबत जाहीर वाच्यता करण्याचे धाडस भाजप आमदारांमध्ये नाही.
काँग्रेस पक्षाचे काही नेते लवकरच देवेंद्रवासी होणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी मंत्रिमंडळ विस्तार लांबला, अशी चर्चा आहे. शिंदे-फडणवीस यांचे सरकार, सर्वपक्षीय सरकार असेल, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, तशी चिन्हे आहेत. काँग्रेस पक्षाचा गट आल्यास तो मंत्रिपदाच्या किती जागा अडवेल? याची धास्ती भाजपमधील मंत्रीपदाच्या इच्छुकांना आहे. लोकसभा जिंकणे एवढे एकमेव ध्येय भाजपपुढे आहे, त्याकरिता कोणत्याही तडजोडी करण्याची भाजप नेतृत्वाची तयारी आहे. हेच कारण पुढे करुन भाजपमधील इच्छुकांची समजूत घातली जात आहे. मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या गटातील इच्छुकांशी बोलून, जरा सबुरीने घ्या, असा सल्ला दिला आहे.
मंत्रिमंडळ विस्तारासाठीचा इच्छुकांचा रेटा आणि पालकमंत्री पदाचे वाटप याचे आव्हान भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर उभे आहे. पुण्याचे पालकमंत्री पद हा त्यापैकीच एक कळीचा मुद्दा आहे. या सर्व परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस हे मात्र नव्या संधीच्या शोधात आहेत. एक तर त्यांना आपले स्थान नव्याने बळकट करण्याची एक ‘ जागा’ हवी आहे किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महत्त्वाचे खाते घेऊन ते दिल्लीकडे रवाना होतील. राज्याच्या राजकारणातून एक्झिट होण्याची नेमकी वेळ कोणती, या संधीच्या ते शोधात आहेत.