ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्ररणधुमाळी

एकनाथ शिंदे, अजित पवार समतोल साधताना पंतप्रधान मोदींची होतेय कसरत

भाजपची भूमिका फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतरही शिंदे यांचे मुख्यमंत्री पद जाणार असल्याची चर्चा चालूच राहिली. पक्षांतरबंदी कायद्यानुसार शिंदे अपात्र ठरतील आणि 10 ऑगस्टला पवार मुख्यमंत्री होतील, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आणि एकच खळबळ उडाली.

भाजपने महाराष्ट्रात सत्ता मिळवणे आणि ती भक्कम करणे याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह त्यांच्या समर्थकांची मदत घेतली. या दोन नेत्यांबरोबर समन्वय साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यापर्यंत सर्वांना कसरत करावी लागत आहे.

राज्यामध्ये शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहाय्याने स्थापन केलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने वर्षभर चांगले काम चालविले. शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती साजरी होत असतानाच 2 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आपल्या 8 सहकाऱ्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळाली.

अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आणि शिंदे गटाचा विरोध असतानाही भाजपच्या नेत्यांनी अर्थमंत्री पद अजित पवार यांना दिले. शिवाय कृषी, सहकार, अन्न नागरी पुरवठा अशी महत्त्वाची खातीही पवार गटाला मिळाली. शिंदे यांना पर्याय म्हणून पवार यांना आणल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. अशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका भाषणात भाजपची भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्याशी आमची भावनिक मैत्री असून, अजित पवार यांच्याशी राजकीय मैत्री आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार यांची चर्चा झाली. भलामोठा पुष्पगुच्छ देऊन मोदी यांनी अजित पवार यांचे अभिनंदन केले, त्यांच्याशी चर्चाही केली. या भेटीवरून तर्कवितर्क करण्यात येऊ लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघेही जण अजित पवार यांच्या सर्व मागण्या मान्य करत आहेत. त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करत आहेत. त्यातून असे दिसून आले की, पवार यांचे राजकीय महत्त्व वाढविण्यात येत आहे. अशा कृतीमुळे शिंदे गट नाराज होत आहे, हे भाजप नेत्यांच्या लक्षात आले आणि भाजप नेत्यांनी समतोल बिघडू नये यासाठी काही पावले उचलण्यास सुरुवात केली. पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयांची भेट याकडे त्यादृष्टीने पाहिले जाते. पंतप्रधान मोदी यांनी दिलखुलासपणे संवाद साधला. शिंदे यांच्या नातवाशीही गप्पा मारल्या. ही भेट शिंदे यांंच्यासाठी आनंदाची ठरली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांशीही भाजप सौहार्दाचे आणि सलोख्याचे संबंध ठेऊ इच्छिते, असा संदेश जनतेत गेला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये