ताज्या बातम्या

हिवाळ्यात महाराष्ट्रातील या बेस्ट ठिकाणांना भेट द्या!

Winter Destinations In Maharashtra : हिवाळा म्हणजे पर्यटनाचा हंगाम असे म्हटले तरी चालेल. या ऋतूत पर्यटन करण्यास वेगळीच मजा असते. मस्त अशी थंड हवा आणि निसर्गात रंगबेरंगी फुलांची मुक्त उधळण तर काही ठिकाणी बर्फवृष्टीचा आनंद यावेळी घेता येतो. तुम्ही मिनी ट्रीपचा प्लॅन करत असाल तर हिवाळी पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील काही थंडगार पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या.

महाबळेश्वर

image 3 19

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे सुंदर निसर्गासाठी आणि तेथील स्पेशल पॉईंट्स साठी प्रसिद्ध आहे. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट हिलस्टेशन हा लौकिक आजही कायम आहे. हिवाळ्याच्या दिवसात पर्यटक आवर्जून या स्थळाला भेट देतात. समुद्रसपाटीपासून 1347 मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर बसस्थानकापासून 7 किमी अंतरावर, केट पॉईंट आणि एलिफंट्स हेड पॉईंट हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरचे सर्वात नयनरम्य दृश्य आहे.

पाचगणी

image 3 20

सातारा जिल्ह्य़ातील महाबळेश्वरच्या बाजूस वसलेले असे अत्युत्तम थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी. आल्हाददायक हवेमुळे या ठिकाणाला हवापालटासाठी प्राधान्य दिले जाते. मुंबई-पुणे-कोल्हापूर पट्टय़ातील लोकांसाठी दोन दिवस हवापालटासाठी हे उत्तम ठिकाण आहे. पाचगणी महाबळेश्वरपासून अवघ्या 20 किमी अंतरावर आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात. खोल दऱ्या, धबधबे, कमलगड, टेबल लँड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे आहेत.

माथेरान

image 3 21

रायगड जिल्ह्‍यातील थंड हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान. माथेरान या हिल स्टेशनला इंग्रज काळापासून फार महत्व आहे. ‘माथेरानची राणी’ म्हणजेच माथेरान येथील मिनी ट्रेन हे पर्यटकांचे आकर्षण आहे. समुद्रसपाटीपासून साधारण 803 मीटर उंचीवर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. माथेरानला सहलीच्या दृष्टीने सर्वांत योग्य काळ म्हणजे सप्टेंबर ते मार्च महिन्यात आहे. माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा सुटावलेली वेगळी आणि उंच अशी डोंगर रांग आहे.

भंडारदरा

image 3 22

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीच्या काठी वसलेले भंडारदरा हे गाव. मुंबईपासून 185 किमी आणि अहमदनगर पासून 155 किमी अंतरावर असणारे भंडारदरा, हे कळसूबाई या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरापासून हाकेच्या अंतरावर आहे. धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा यामुळे इथल्या मूळच्या निसर्गसौंदर्यात भर पडली आहे. भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. तसेच येथील प्रवरा नदीचा उगम जवळच्या रतनगडावर झालेला आहे.

चिखलदरा

image 3 23

अमरावती जिल्ह्यात असलेल्या मेळघाटचा पूर्व वनप्रदेश म्हणजे चिखलदरा. समुद्रसपाटीपासून 1118 मीटर उंचीवर असणारे चिखलदरा हे वर्षभर उष्ण तापमान असणाऱ्या विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. महाभारत ह्या महाकाव्यात चिखलदरा या ठिकाणाचा उल्लेख आढळतो. गर्द वनराईतील चिखलदऱ्यात भटकताना येथील निसर्गसृष्टीचे अवलोकन करता करता सातपुड्यातील एका उंच अशा पंचबोल पॉईंटच्या दऱ्याखोऱ्यांतून कधी कधी वाघाची डरकाळी ऐकू येते. मात्र या सर्वांवर मात करते ते येथील आल्हाददायक वातावरण.

लोणावळा – खंडाळा

image 3 25

पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि तिथून अवघ्या तीन किमी अंतरावर असणारे खंडाळा ही दोन थंड हवेची ठिकाणे कित्येक पर्यटकांना आकर्षित करतात. या ठिकाणी असलेली प्राचीन लेणी आणि धबधबे पाहणे, ही निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच असते. पुणे-मुंबई महामार्गावर समुद्र सपाटीपासून 625 मीटर उंचीवर असलेले लोणावळा, गेल्या अनेक दशकांपासून पर्यटकांना भुरळ घालत आहे. लोहगड-विसापूर यांच्या वेढ्याने लोणावळ्याचे महत्त्व वाढले आहे. खोल दऱ्या, हिरवाईने नटलेला डोंगर आणि वाऱ्याचा मंद प्रवाह यामुळे लोणावळ्यातून निसर्गप्रेमींचा पायच निघत नाही.

तोरणमाळ

image 3 26

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे पर्यटन स्थळ सातपुडा पर्वताच्या चौथ्या पर्वत रांगेत समुद्रसपाटीपासून 377o फूट उंचीवर वसलेले आहे.  इथे टेकडीवर ‘तोरणा’ देवीचे मंदिर देखील आहे. पुराणात तोरणमाळचा ‘तूर्णमाळ’ असाही उल्लेख सापडतो. मुबलक प्रमाणात तोरणाची झाडे असल्याने त्याला तोरणमाळ, हे नाव पडले असल्याचे बोलले जाते. राज्याच्या प्रमुख शहरांपासून आणि महामार्गांपासून अलिप्त असल्याने तोरणमाळ तसे अनाघ्रात पर्यटन स्थळ आहे. अहिराणीचं लाडकं हिल स्टेशन म्हणून तोरणमाळ ओळखले जाते.

म्हैसमाळ

image 3 27

औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या म्हैसमाळची ख्याती सर्वदूर आहे. समुद्रसपाटीपासून 1067 मीटर उंचीवर असणारे हे थंड हवेचे ठिकाण ‘मराठवाड्याचे महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाते. म्हैसमाळचा प्रसन्न निसर्ग पावसाळ्यात खऱ्या अर्थाने बहरून येतो. म्हैसमाळ येथील ‘व्ह्यू पॉइंट’ पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. हिरवीगार झाडी आणि लहरी टेकड्यांमुळे हे ठिकाण भव्य आणि नंदनवन दिसते. म्हैसमाळ हे एक उत्तम ठिकाण आहे जिथे थंडीच्या दिवसात निसर्गाच्या शांततेचा आणि एकांताचा आनंद घेता येऊ शकतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये