क्राईमताज्या बातम्यापुणे

महावितरणने वीज तोडली म्हणून महिला कर्मचाऱ्यांना डांबून ठेवत अंगावर सोडले कुत्रे; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे | पुण्यातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक (Pune Crime News) प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. वीज कापल्याच्या रागातून दाम्पत्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना डांबून ठेवत त्यांच्या अंगावर कुत्रे सोडल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या प्रभात रोडवर बुधवारी दुपारी ही घटना घडली असून या प्रकरणात पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. डेक्कन पोलिसांनी आरोपींच्या अटकेची कार्यवाही सुरू केली असून या घटनेवरून संताप व्यक्त केला जात आहे.

डेक्कन उपविभागांतर्गत कार्यरत दोन महिला तंत्रज्ञ बुधवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास प्रभात रस्ता परिसरात थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे कर्तव्य बजावत होत्या. त्या वेळी त्यांनी प्रभात रस्त्यावरील एका अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या दाम्पत्याकडे पाच हजार 206 रुपयांची थकबाकी असल्याने त्यांचा वीजपुरवठा कापला. वीजबिल ऑनलाइन भरल्यास लगेच वीजपुरवठा सुरू करू, असेही महिला तंत्रज्ञांनी सांगितले. त्यावर दाम्पत्याने ऑनलाइन वीजबिल भरण्यास नकार देऊन धनादेश स्वीकारण्याचा आग्रह धरला. मात्र, वीज देयकाची रक्कम स्वीकारण्याचा अधिकार नसल्याचे तंत्रज्ञांनी नम्रपणे सांगितले. त्यावर दाम्पत्याने त्यांना शिवीगाळ सुरू केली. नाईलाजाने दोन्ही महिला तंत्रज्ञ खाली निघाल्या असता, त्यांना लिफ्टमधून जाण्यास मज्जाव करून सुरक्षारक्षकाकडून जिन्याचा दरवाजा बंद करून घेतला. त्यामुळे महिला तंत्रज्ञ जिन्यातच अडकल्या. त्या वेळी दाम्पत्याने त्यांच्या अंगावर दोन कुत्रे सोडले. त्यामुळे घाबरलेल्या महिला तंत्रज्ञांनी तत्काळ ‘महावितरण’च्या कार्यालयात आणि पोलिस ठाण्यात संपर्क साधला.

महावितरणच्या अधिकाऱ्यांना डांबून ठेवल्याची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींवर सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींच्या अटकेची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये