ताज्या बातम्यामहाराष्ट्र

महायुतीचा शपथविधी सोहळा लांबणीवर? विधानसभेची मुदत संपल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू होणार?

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. महायुतीने 288 विधानसभा मतदारसंघात 230 ठिकाणी विजयाचा झेंडा फडकवलाय. यात भाजप १३२, शिवसेना (एकनाथ शिंदे) 57 आणि राष्ट्रवादीला 41 (अजित पवार) जागांवर यश मिळाले. त्यानंतर आज किंवा उद्याच शपथविधी होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता शपथ विधी सोहळा लांबणीवर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

26 तारखेला या सरकारची मुदत संपत असली तरी एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत. तोपर्यंत राज्यात आणि केंद्रात चर्चा पूर्ण करून २७ ते २९ तारखेपर्यंत सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे. विधानसभेची मुदत उद्या संपत असली, तरी नव्या सरकारचा शपथविधी त्याआधीच झाला पाहिजे, असे बंधनकारक नसल्याचे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. यापूर्वीही निकालाच्या दीर्घ कालावधीनंतर शपथविधी आणि सत्तास्थापना झालेली आहे. विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी नवीन सत्ता स्थापना न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागण्याचा समज चुकीचा असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडण्यासाठी दिल्लीत होणार बैठक 

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होणं गरजेचं आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह आणि अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची दिल्लीत संयुक्त बैठक होईल. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांची निवड होईल. बुधवार २७ ते शुक्रवार २९ नोव्हेंबर या तारखांच्या दरम्यान शपथविधी होऊ शकतो. तर उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी नंतर होणार असल्याची चर्चा आहे. नुकतेच अजित पवार यांनी देखील 27 तारखेच्या आत सरकार आलं पाहिजे, नाही तर राष्ट्रवादी राजवट लागू होईल असं काहीही होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

मंत्रीमंडळाचा फॉर्मुला कसा असणार ?

मिळालेल्या माहितीनुसार ६-७ आमदारांमागे एक मंत्रिपद देण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार भाजपला सर्वाधिक २२-२४, शिवसेनेला १०-१२ आणि राष्ट्रवादीला ८-१० मंत्रिपदांची शक्यता आहे.

कोणाला किती जागा मिळाल्या ?

विधानसभा निवडणुकीत महायुतीला २८८ पैकी २३६ जागांवर यश मिळालं आहे. भाजपला १३२, शिवसेनेला ५७, तर राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या आहेत. याशिवाय भाजपच्या मित्रपक्षांना पाच, तर शिंदेंच्या मित्रपक्षांना एका जागेवर यश मिळालं आहे.

तर महाविकास आघाडीला एकूण ४६ जागा आल्या आहेत. ज्यात काँग्रेसला १६, राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना १० जागा, तर शिवसेना (ठाकरे गट) २० जागा मिळाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये