महेश कोठारे यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडील आणि ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचं निधन
मुंबई | Ambar Kothare Passed Away – मराठीचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महेश कोठारे यांचे वडील आणि ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे (Ambar Kothare) यांचं आज (21 जानेवारी) सकाळी वृद्धपकाळानं निधन झालं आहे. ते 96 वर्षांचे होते. तसंच अंबर कोठारे (Ambar Kothare) यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (Ambar Kothare Passed Away)
अंबर कोठारे (Ambar Kothare) यांचं बालपण अत्यंत कष्टात गेलं आहे. कोठारे यांनी घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे वेगवेगळी कामे केली आहेत. दिवाळीच्या काळात गिरगावात रस्त्यावर उटणं विकण्याचंही काम त्यांनी केलं होतं. त्यानंतर शिक्षण पूर्ण करून त्यांनी ‘ब्रिटिश बॅंक ऑफ दि मिडल इस्ट’ या बँकेत नोकरी केली. तब्बल चार दशकं त्यांनी बँकेत वेगवेगळ्या पदांवर काम केलं होतं. विशेष म्हणजे त्यांना बँकेचे भारतातर्फे प्रतिनिधीत्व करण्याची संधीही मिळाली होती.
अंबर कोठारे यांनी नोकरी सांभाळत आपली रंगभूमीची आवडदेखील जोपासली आहे. त्यांनी प्रायोगिक रंगभूमीवर दीर्घ काळ काम केलं होतं. ते ‘इंडियन नॅशनल थिएटर’ (आयएनटी) या संस्थेच्या मराठी विभागाचे पहिले सचिव होते. या संस्थेतर्फे त्यांनी अनेक नाटकं रंगभूमीवर सादर केली. त्यांनी ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकाचे शेकडो प्रयोग सादर केले होते. तसंच ‘झुंजारराव’ नाटकामधील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. अंबर कोठारे यांनी नाटकांची निर्मिती देखील केली होती. ‘जेथे जातो तेथे’ या एका प्रमुख नाटकाची त्यांनी निर्मिती केली होती.