समृद्धीवर मोठी दुर्घटना; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, मृताच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर

Samruddhi Mahamarg Accident – समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्यातील (Thane) शहापूर (Shahapur) तालुक्यातील सरलांबे येथील पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळली. यावेळी 17 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम रात्रीही सुरू होतं. त्यावेळी ही दुर्घटना घडली. गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब हा तब्बल शंभर फूट उंचावरून कामगारांच्या अंगावर कोसळला. यामध्ये 17 कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून तीन ते चार जण जखमी आहेत. सध्या जखमींना रूग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसंच या दुर्घटनेत मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जातीये. दरम्यान, दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदतही जाहीर केली आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटलं आहे की, “महाराष्ट्रातील शहापूर येथील भीषण दुर्घटनेनं दु:ख झालं आहे. माझ्या सहवेदना मृतांच्या कुटुंबासोबत आहेत. तसंच जखमींनी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करत आहे. तर स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफकडून अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत दिली जाणार असून जखमींना 50 हजार रूपये देण्यात येतील.”