स्वतःच्या हाताने मित्रांसाठी बनवा खास ‘फ्रेंडशिप बँड’
6 ऑगस्टला सगळीकडे मैत्रीचा सण उत्साहात साजरा केला जातो. मैत्री दिवस म्हणजेच फ्रेंडशिप डे (Friendship Day). हा स्पेशल दिवस दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. या खास दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणींसबोत वेळ घालवतात, पार्टी करतात, फिरायला जातात, एकमेकांना भेटवस्तू देतात. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचा मित्र हा खूप खास असतो. मैत्रीचं नातं हे एक असं नातं आहे जे हक्काचं, प्रेमाचं आणि अतुट असं नातं आहे. भलेही रक्ताचं किंवा कुटुंबाचं नातं नसलं तरी हे नातं मनापासून केलेलं असतं. तर फ्रेंडशिप डे या खास दिवशी लोक आपल्या मित्रांना फ्रेंडशिप बँड (Friendship Band) बांधतात. कारण फ्रेंडशिप बँड हे मैत्रीचं प्रतीक मानलं जातं. तर आता तुम्ही हे फ्रेडशिप बँड घरीच तयार करू शकता तेही घरात उपलब्ध असलेल्या काही गोष्टींपासून. चला तर मग आता आपण हे फ्रेडशिप बँड कोणत्या गोष्टींपासून आणि कसं बनवू शकतो याबाबत जाणून घेऊया.
मण्यांपासून फ्रेंडशिप बँड – प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या रंगांचे मणी, मोती आढळतात. तसंच भरपूर मुलींकडे रंगीबेरंगी मोती किंवा मणी असतातच. तर याच मोत्यांचा वापर करून तुम्ही एक सुंदर असं फ्रेंडशिप बँड बनवू शकता. हे मोत्यांचे फ्रेंडशिप बँड बनवण्यासाठी लवचिक आणि रंगीत लोकरीमध्ये रंगीबेरंगी मोती किंवा मणी धागा, त्यानंतर दोन्ही टोकांना गाठ बांधा. हे फ्रेंडशिप बँड बनवायला खुप सोप्पे असून दिसायलाही खुप सुंदर दिसते. हे बँड तुम्हीही ट्राय करा आणि तुमच्या मित्रांना नक्की बांधा.
धाग्यापासून फ्रेंडशिप बँड – घरात आई, आज्जीकडे सुती किंवा रेशमी असे धागे असतातच. तर तुम्ही या रंगीबेरंगी धाग्यांपासून सहजपणे फ्रेंडशिप बँड बनवू शकता. हे बँड बनवण्यासाठी दोन वेगवेगळ्या रंगाचे धागे घ्या आणि ते धागे गुंफून त्याची वेणी बनवा. त्यानंतर दोन्ही टोकांना गाठ बांधा. काही मिनिटांत तयार होणारं असं हे फ्रेंडशिप बँड दिसायला अतिशय सुंदर दिसते. ते बँड तुमच्या मित्र-मैत्रिणींना द्या त्यांना ते नक्कीच आवडेल.
साखळीपासून फ्रेंडशिप बँड – तुमच्याकडे जाड किंवा पातळ अशा प्रकारच्या साखळ्या असतील तर त्यापासून तुम्ही फ्रेंडशिप बँड बनवू शकता. हे बँड बनवताना तुम्ही तुमच्या मित्राच्या नावाचे पहिले अक्षर किंवा घुंगरू वापरून त्या साखळीवर वापरू शकता. साखळीवर फेव्हिकॉलच्या सहाय्याने घुंगरू चिटकवा. अशाप्रकारे काही मिनिटांतच तुमचं साखळी फ्रेंडशिप बँड तयार आहे. हे बँड तुम्ही तुमच्या खास मित्राला गिफ्ट करा.