बापरे! शेतीला एकही बांध नसणारं गाव; अनोख्या गावाची महाराष्ट्रात सर्वत्र चर्चा

मुंबई : (Mangalwedha News Without Border in Farm) राज्यात सर्वात जास्त तंटे हे शेतीच्या बांधावरुन होत असतात. बांधाच्या वादावरून अगदी ‘सख्खे भाऊ पक्के वैरी’ झाल्याच्या बातम्या नेहमीच आपल्या वाचनात किंवा पाहण्यात येतात. महसूल, पोलीस आणि न्यायालयात सर्वात जास्त खटले देखील बांधावरुन झाल्याचे दिसते. मात्र, महाराष्ट्रात (Maharashtra) एक असे गाव आहे की जिथे शेतीला एकही बांध नाही. शेतील बांध न घालण्याची शेकडो वर्षाची अनोखी परंपरा आजही या गावाने कायम ठेवली आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मंगळवेढा (Mangalwedha) शिवारात आजही जवळपास 38 हजार हेक्टर म्हणजे 1 लाख एकर शेतीला बांध नाही.

एका बाजूला राज्यात पिढ्या वाढतील तशी शेतीच्या तुकड्यांची संख्या वाढत चालली आहे. हे होत असताना बांधाचे वाद ही महाराष्ट्रासमोरची मोठी डोकेदुखी बनत चालली आहे. मंगळवेढ्यात आजही शेतीला बांध न घालण्याची शेकडो वर्षाची अनोखी परंपरा आजही कायम आहे. इथे शेतीच्या शिवेवरून किंवा बांधावरून कधी वादच होत नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हे शहर संत दामाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि संतपरंपरा असणारे शहर आहे. मंगळवेढ्यात जवळपास 38 हजार हेक्टर म्हणजे 1 लाख एकर शेतीला आजवर कधीच बांध घालण्याची परंपरा नाही. हे विशेष आहे. एखाद्या रोडवर सलग 15 किलोमीटरपर्यंत पाहत गेला तरी तुम्हाला बांध नावाचा प्रकार पाहायला मिळत नाही.

मंगळवेढ्याची ओळख ज्वारीचे कोठार म्हणून केली जाते. येथील मालदांडी ज्वारीला केंद्र सरकारचे GI मानांकन देऊन तिला सातासमुद्रापार पोहोचवले आहे. अगदी 200 मीटरपर्यंत धर नसलेली काळ्याशार जमिनीतून ही कसदार ज्वारी पिकते. त्यामुळेच या शिवारातील गुळभेंडी हुरड्याला देखील काही न्यारीच चव असते. येथील काळ्या कसदार जमिनीतून केवळ एखाद्या पावसावर येणारी मोत्यासारखी पांढरी शुभ्र ज्वारी, हरभरा, करडई या पिकात औषधी गुणधर्म असल्याने याला फार मोठी मागणी असते. येथील शेतकऱ्यांनी कधीच ज्वारीचे बियाणे बाजारातून खरेदी केल्याचे ऐकिवात नाही. पिढ्यानपिढ्या शेतात आलेल्या ज्वारीतून दरवर्षी पुढच्या वर्षीच्या बियाणासाठी थोडी ज्वारी ठेवण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे.

Prakash Harale: