”वेळ घ्या पण सरसकट आरक्षण द्या”, मनोज जरांगेंनी दिली २ जानेवारीची वेळ
अंतरवली सराटी : (Manoj Jarange On Stata Government) राज्य सरकर जर सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार असेल तर आम्ही वेळ द्यायला तयार आहोत, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केली आहे. धनंजय मुंडे, अतुल सावे, उदय सामंत, संदीपान भूमरे या मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटी येथे गेलं होतं. त्यापूर्वी दोन माजी न्यायमूर्तींनी त्यांच्याशी चर्चा केली होती.
शिष्टमंडळाची शिष्टाई फळाला आलेली असून मनोज जरांगे पाटील यांनी दोन पावलं मागे येत सरकारला वेळ देण्याची भूमिका घेतली आहे. राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन शिष्टमंडळाने दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ देण्याची भूमिका जाहीर केली आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, सर्वांची दिवाळी गोड झाली पाहिजे, या मताचा मी आहे. हा आरक्षणाचा लढ जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सुरुच राहणार असेल. सरकारने दिलेला शब्द पाळावा, आम्ही वेळ द्यायला तयार आहोत असं जरांगेंनी जाहीर केलं. दरम्यान, मनोज जरांगे यांनी २४ डिसेंबर २०२३ पर्यंतची वेळ सरकारला दिली असून तोपर्यंत सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली आहे. तर शिष्टमंडळाने २ जानेवारीपर्यंतची वेळ मागितली होती. परंतु जरांगे भूमिकेवर ठाम होते.