ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

”एकाचा जीव धोक्यात घातल्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही”, जरांगे थेट बोलले

मुंबई : (Manoj Jarange On State Government) मराठा आरक्षणासाठी जालन्यातल्या आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. रविवारी उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांनी सरकारला चर्चेसाठी दारं खुली केलीत. दोन दिवस मी बोलू शकतो त्यामुळे दोन दिवसात काय बोलायचं ते बोला, असं जरांगे म्हणाले.

रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की, सरकारला आरक्षण द्यायचं नसेल तर मराठ्यांचा सामना करावा लागेल. कुणाचातरी जीव धोक्यात गेल्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही. माझ्या हृदयाला काहीही होणार नाही. माझं हृदय बंद पडलं तर सरकारचंही हृदय बंद पडेल. मला काहीही झालं तरी मराठा समाज आंदोलन करणारच आहे.

पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, चर्चेला येऊ देत नाहीत असं कारण देत सरकार आरक्षण देणार नाही. त्यामुळे दोन दिवस चर्चेसाठी मी तयार आहे. त्यानंतर मला बोलता येणार नाही. माझी बोलती बंद झाल्यावर रट्टे खाण्यासाठी येणार का? तुमचे कोण मातब्बर आहेत, त्यांना घेऊन या. मराठा समाज तुम्हाला काहीच बोलणार नाही. उलट तुम्हाला संरक्षण देईल.

एकप्रकारे सरकारला चर्चेसाठी आंतरवाली सराटीची दारं खुली झाली आहेत. त्यामुळे आज आणि उद्या (सोमवारी) मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकार कुणाला पाठवतं? हे बघणं महत्त्वाचं आहे. राज्यातील हजारो गावांमध्ये साखळी उपोषणं सुरु आहेत. शिवाय पुढाऱ्यांना गावबंदीदेखील केलीय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये