अखेर मानसी नाईकनं सांगितलं घटस्फोटाचं कारण; म्हणाली, “खालच्या थराला…”

मुंबई | Manasi Naik – मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं तिच्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. तसंच मानसीची ‘बाई वाड्यावर या’, ‘बघतोय रिक्षावाला’ ही गाणी चांगलीच गाजली आहेत. दरम्यान, ती आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीर खरेरा हे दोघे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. यासंदर्भात मानसीनं स्वत: एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

मानसी नाईकनं नुकतीच ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य केलं आहे. “माझ्या घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधीत प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दुःखी आहे.” असं मानसीनं म्हटलं आहे.

पुढे मानसीनं घटस्फोटामागची कारणही सांगितली आहेत. “आमच्यात नेमकं काय चुकलं हे सांगणं आता माझ्यासाठी कठीण आहे. आमच्यात काही गोष्टी ठीक होऊ शकल्या नाहीत. पण हे सगळं खूपच वेगात घडलं. आजही माझा प्रेमावर विश्वास आहे. मला पुन्हा प्रेम करायचंय. पण एक वेळ अशी होती जेव्हा मला माझं कुटुंब हवं होतं. म्हणून मी लग्न केलं. अर्थात तेही खूप घाईघाईत झालं”, असं मानसी म्हणाली.

“मला वाटतं कदाचित तिथेच काहीतरी चुकलं. या लग्नाच्या नात्यातून वेगळं होण्याची वेळ आता आली आहे. त्याच्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल मला कायम आदर आहे. पण एक स्त्री म्हणून माझा स्वाभिमान आणि स्वतःची काही मतंही महत्त्वाची आहेत. एखाद्या व्यक्तीला आपण सोडून देऊ एवढ्या खालच्या थराला ती व्यक्ती जाऊ शकते हे समजून घेणं माझ्यासाठी गरजेचं होतं”, असंही मानसी नाईक म्हणाली.

Sumitra nalawade: