मराठा आरक्षण आंदोलनाची धग ST महामंडळाला; 4 दिवसांत कोट्यवधींचे नुकसान
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Resrvation) मागणीसाठी राज्यभर आंदोलनं केली जाता आहेच . याच आंदोलनाची धग आता एसटी महामंडळालाही (ST Mahamandal) बसू लागलीये. काही ठिकाणी एसटीवर दगडफेक करण्यात आली तर काही ठिकाणी थेट एसटीच पेटवण्यात आली. एसटीचं हेच नुकसान थांबवण्यासाठी महामंडळाने एसटीच्या सेवेला ब्रेक लावलाय.
या आंदोलनामुळे पुण्यातून मराठवाडा विदर्भ आणि सोलापूरला जाणाऱ्या 750 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मराठवाडा विदर्भ जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. पुण्यातून एसटी बसच्या दररोज 1 हजार 556 फेऱ्यांची नियोजन केले जाते. आंदोलनामुळे 750 फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. प्रामुख्याने बीड जिल्ह्यासह अमरावती,नागपूर,मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातील फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
पुणे विभागाचे आर्थिक नुकसान 40 लाख 27 हजारपेक्षा जास्त
परभणी जिल्ह्यातही मराठा आरक्षणाची धग कायम आहे. चार दिवसांपासून परभणी, पाथरी, गंगाखेड, जिंतूर , हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या सात आगारातून धावणारी बस सेवा पूर्णपणे बंद असल्याने परभणी विभागाला पावणे दोन कोटींचा फटका बसला आहे. लाल परीची सेवा बंद असल्याने खाजगी वाहन धारकांचे मात्र अच्छे दिन आले तर प्रवाशांच्या खिशाला मात्र मोठी कात्री बसली आहे.
सोमवारपासून नाशिकहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस देखील बंदच आहेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मागील 4 दिवसांपासून नाशिकहून मराठवाड्याकडे जाणारी एसटी सेवा बंद आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, सिल्लोड, परभणी, पैठण यासह मराठवाड्यातील अन्य शहरात जाणारी एसटी सेवा बंद आहे.