यवतमाळमध्ये वातावरण पेटलं; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मराठा कार्यकर्त्यांचा गोंधळ
यवतमाळ | Maratha Protest : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यातील वातावरण चांगलंच पेटलं आहे. काही ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. बीडमध्ये मराठा आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करत जाळपोळ केली. तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये आमदार प्रकाश बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे सध्या मराठा आंदोलनाला हिंसक वळण आल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता यवतमाळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) कार्यक्रमातही आंदोलकांनी मोठा गोंधळ केल्याचं समोर आलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी यवतमाळमध्ये आले होते. त्यावेळी या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंसमोर मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले. तसंच त्यांनी यावेळी घोषणाबाजी करत मोठा गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
यवतमाळमध्ये एकनाथ शिंदे हे कार्यक्रमस्थळी येत असताना काही मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. तसंच कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मराठा कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला. महत्त्वाचं म्हणजे या गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये महिला कार्यकर्त्यांचा देखील समावेश होता.