अग्रलेख

दिवाळीखरेदीला बाजाराची साथ

दोन वर्षांनंतर मनसोक्त खरेदी

वसुबारसेपासून भाऊबीजेपर्यंत आपण वेगवेगळ्या देवतांच्या पूजा करत असलो, तरी खरी तयारी ‘स्व’पासून सुरू होते. घरादाराची स्वच्छता झाल्यानंतर सौंदर्योपचार, केसापासून पायापर्यंतचे अवयव सुशोभित करणारी प्रावरणं आणि दागिने, जगणं सुसह्य आणि अधिक रंजक, वेधक करणारी विविध उपकरणं, गॅझेट अशी एक ना अनेक प्रकारची खरेदी स्वांतसुखासाठीच केली जाते. आताही अशाच खरेदीत्सुकांनी बाजार गजबजला आहे.

दिन दीन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी… म्हणत आनंदवर्षावात भिजण्याची तब्बल दोन-अडीच वर्षांनंतर आलेली संधी तना-मनाबरोबरच बाजारातही चैतन्य निर्माण करत आहे. गेली दोन वर्षं दारासमोर पणत्या तेवल्या, पण त्यांत तेज नव्हतं. अंगणात आकाशकंदील लागले, पण त्यातून पाझरणार्‍या शलाका अंमळ क्लांत होत्या. प्रत्येक घरात नवे कपडे, गोडाधोडाचे जिन्नस आलेच असंं नाही. मात्र तम दूर झाला आणि प्रकाशाचा मार्ग प्रशस्त झाला. या प्रसन्न मार्गावरून दमदार पावलं टाकत यंदाची दिवाळी आपल्या घरी येत आहे. दिवाळी हा वर्षातला सर्वांत मोठा सण आहेच, पण तो केवळ सण नसून, आप्तस्वकियांबरोबरच स्वत:वरही प्रेम करण्याची पर्वणी आहे. वर्षभर आपल्या उपयोगी पडणार्‍या प्रत्येक सजीव-निर्जीव घटकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचे अनेक दिवस आपण साजरे करतो. आपलं जगणं सुखकर करणार्‍या घटकांना मान-सन्मान प्रदान करतो. पण दिवाळी हा आपल्या ‘जगण्याचा उत्सव’ असतो. वर्षभर काम केल्यानंतर संचिताचा विनियोग प्रामुख्यानं याच उत्सवपर्वात होतो. घरातल्या स्वकियांप्रमाणेच स्वत:चेही लाड पुरवून घेणं प्रत्येकाला आवडतं.

थोड्या दबक्या आवाजात आजी-आजोबाही साडीचोळी आणि शर्ट-पँट अथवा धोतरासारख्या काही छोट्या-मोठ्या मागण्यांचा उल्लेख करून जातात आणि त्या पुरवल्यानंतर त्यांच्या मुखावरही बालसुलभ हसू विलसतं. हे सगळं अंतरात्म्याचं सुखावणंच नसतं का? ते लोभस हसू आत्मप्रेमापोटीच उमललेलं नसतं का? आपण काकडारतीने देवाला उठवतो, मुख प्रक्षालन करवून अभिषेक घालतो. षोडशोपचारे पूजा करतो. रुचकर पक्वान्नांचा नैवेद्य दाखवतो आणि स्तवनं-स्तोत्र म्हणून त्याला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो. देवी-देवतांची ही दिवाळी रोज साजरी होत असते. मग फुलबाज्यांची वर्तुळं नाचवत अभ्यंगस्नानावेळी होणारं औक्षण त्याच्याशी साधर्म्य राखणारंच नाही का? ही आपल्या हृदयात दडलेल्या देवाची आरतीच तर असते! मखमालीचे मऊ मऊ नवीन कपडे हे देवानं दिलेल्या या सुंदर देहाची वेशभूषा असते. दागिने घालून सजणं-धजणं हा देहाचा शृंगार असतो, तर पंचपक्वान्नाचं जेवण हे जठराग्नीत पडणार्‍या मंगल आहुतीसमान असतं.

जीवनसरितेला वाहिलेलं ते मंगलमय अर्घ्य असतं. रम्य रांगोळ्यांनी सजलेल्या पंगतीमध्ये मिठास पक्वान्नांचा घास घेताना केवळ जीभ नव्हे, तर आत्मा सुखावतो. म्हणूनच तो अंतरात्म्याचा नैवेद्य असतो. तसंही आपण रोज जेवतोच, पण त्यात आणि दिवाळीतल्या पंक्तीत कमालीचा फरक असतो. पहाटेचं अभ्यंगस्नान, देवदर्शन, न्याहारी, आप्तेष्टांच्या भेटीगाठी, वामकुक्षी, तिन्हीसांजेची पूजा आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर गप्पा मारत वा एखादी सुरेल मैफिल अनुभवत येणारी शांत झोप ही शरीर-मन-श्रुती-दृष्टी, वाचा, स्पर्श, संवेदना आदींची दिवाळीच तर असते. म्हणूनच दिवाळी ही फक्त देवाची नव्हे, तर देहाचीही पूजा ठरते. शरीरातल्या पंचमहाभूतांना तो प्रणाम ठरतो! त्यामुळेच की काय, वसुबारसेपासून भाऊबीजेपर्यंत आपण वेगवेगळ्या देवतांच्या पूजा करत असलो, तरी खरी तयारी ‘स्व’पासून सुरू होते. घरादाराची स्वच्छता झाल्यानंतर फेशिअल आदी सौंदर्योपचार, केसापासून पायापर्यंतचे अवयव सुशोभित करणारी प्रावरणं आणि दागिने, जगणं सुसह्य आणि अधिक रंजक, वेधक करणारी विविध उपकरणं, अद्ययावत गॅझेट, गाड्या अशी एक ना अनेक प्रकारची खरेदी स्वांतसुखासाठीच केली जाते. आताही अशाच खरेदीत्सुकांनी बाजार गजबजला आहे. कपडे, मोबाइल, होम अप्लायन्स यासह दिवाळी अंक, पुस्तके, दागदागिने अशाही मौल्यवान वस्तू खरेदीसाठी बाजारपेठ अखेरच्या दोन दिवसांत बहरली आहे.

-वैष्णवी कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये