मॅक्सवेलचं द्विशतक अन् शरद पवारांचा ‘तो’ फोटो; रोहित पवारांच्या ट्विटने वेधलं सर्वांचंच लक्ष
Rohit Pawar | काल (7 नोव्हेंबर) अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) दमदार अशी कामगिरी केली. या खेळीदरम्यान ग्लेन मॅक्सवेलला क्रॅम्प्सचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याला मैदानात उभं राहणं देखील कठीण झालं होतं. पण मैदानात उपस्थित असलेल्या चाहत्यांनी मॅक्सवेलचा गजर करत त्याला आधार दिला. त्यानंतर मॅक्सवेल नव्या उमेदीने उठला अन् द्विशतक ठोकून गेला. सध्या त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. यामध्ये आता रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील मॅक्सवेलचं कौतुक करत त्याचा संबंध शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी जोडला आहे.
रोहित पवारांचं एक ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शरद पवारांची पावसातील सभा आणि ग्लेन मॅक्सवेलचं द्विशतक याचा संबंध जोडला आहे. त्यामुळे रोहित पवारांच्या या ट्विटनं सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.
रोहित पवारांनी ट्विटमध्ये शरद पवारांच्या साताऱ्यातील पावसातील सभेचा एक फोटो आणि ग्लेन मॅक्सवेलचा एक फोटो शेअर केला आहे. हे फोटो शेअर करत रोहित पवारांनी लिहिलं आहे की, परिस्थिती कितीही विरोधात असली, मैदानात ‘योद्धा’ जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावंच लागतं. नुसतं लढावंच लागत असं नाही तर शानदार पद्धतीने विजयही खेचून आणावा लागतो. अशा वेळी परिस्थितीही नक्कीच साथ देते, मग ते मैदान क्रिकेटचं असो की राजकीय! हेच काल ग्लेन मॅक्सवेलनं दाखवून दिलं.
रोहित पवारांच्या या ट्विटनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. तसंच त्यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स देखील केल्या आहेत.