पारा घसरला, महाराष्ट्र गारठला; कुठे कडाक्याची थंडी तर कुठे धुक्याची चादर…

मुंबई : राज्यात तापमानात (Temperature) सातत्यानं चढ उतार होत आहे. कुठे थंडी (Cold Weather) तर कुठे ढगाळ वातावरण आहे. तर काही भागात पावसाची स्थिती देखील निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा चांगलाच घसरल्याचं चित्र दिसत आहे. नंदूरबारमध्ये (Nandurbar) तापमानाचा पारा 8.5 ते 9 अंश सेल्सिअसच्या आसपास गेला आहे.
धुळे जिल्ह्यात 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. थंडीचा कडाका वाढला असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. नंदूरबार जिल्ह्यातही थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये (Satpura Mountain Range) तापमानाचा पारा चांगलाच खाली आला आहे. तिथे तापमानाचा पारा 8.5 ते 9 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आहे. तर तोरणमाळ परिसरात धुक्याची चादर पसरली आहे.
थंडी वाढल्याचा परिणाम मानवी जनजीवनावर होत असल्याचे चित्र दिसत आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा 11 अंश सेल्सिअसवर गेला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने कडाक्याची थंडीचा गारठा वाढला आहे. या थंडीचा परिणाम हा दिवसभर जाणवत आहे. वाढत्या थंडीमुळं सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची संख्या घटली आहे. दुसरीकडं दिवसभर धुक्याची चादर पसरली असल्याने याचा परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.