
काळजाच्या एका कप्प्यात साठवून ठेवलेला… अर्थात साहिरविषयीचा हा लेख… सध्या साहिरचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे, त्या निमित्ताने
स्मरणरंजन | श्रीनिवास वारुंजीकर |
पौर्णिमेच्या रात्री, चंद्र चांदण्यांच्या शीतल मंद प्रकाशात, यमुनेच्या नीतळ जलाशयात एखादी अस्मानीची, शुभ्र परी उभी असावी असा ताजमहाल पाहिला, की खरं तर एखाद्यानं संमोहित व्हायला हवं. वातावरणातला कैफ हृदयात साठवत बेगुमानपणे स्वत:ला सुखाच्या राशींवर ढकलून द्यायला हवं. एक मूर्तिमंत लावण्यमयी कविता ताजमहालच्या रूपानं तिथं अवतरलेली असताना शब्दांनी अजूनच हळवं व्हायला हवं आणि या अस्मानी, आरस्पानी सौंदर्याचं वर्णन करताना एखादं नवं गीत, एखादी भावविभोर कविता जन्मायला हवी… पण खरंच यातलं काहीच घडत नाही. इतकं नयनरम्य दृष्य पाहून तो हळवा न होता अधिकच करुण बनतो. हाँ, वही! साहिर लुधियानवी! ‘तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक है तुमको। मेरी बात और है, मैंने तो मुहब्बत की है।’ अशा अफलातून ओळी लिहिणारा साहिर!
दुनियाने तजिराबातों,
हवादिस की शक्ल में,
जो कुछ मुझे दिया हैं,
वही लौटा रहा हूँ
असं बिनदिक्कत आपल्या शायरीचं वर्णन करणारा खंदा कवी. दुनियेने जे ‘घिनौने’ प्रसंग माझ्या झोळीत टाकले, त्याचंच वर्णन माझ्या गीतातून तुम्हाला आढळेल असं प्रांजळपणे सांगून टाकणारा साहिर! आयुष्यभर संघर्ष ज्याच्या वाट्याला आला त्याचं नाव साहिर.
जिंदगी भीक में नही मिलती
जिंदगी बढके छिनी जाती है
अपना हक संगदिल जमाने से
छीन पाओ तो कोई बात बने
असं ठणकावून सांगणारा साहिर, न मूँह छुपा के जियो और न सर झुका के जिओ असं सांगतानाच, सर झुकाने से कुछ नही होगा.. सर उठाओ तो कोई बात बने… असं म्हणतो तेव्हा त्याच्या आत्मसन्मानाची झलक पहायला मिळते.
साहिरच्या आत्मसन्मानासाठी होणाऱ्या संघर्षाच्या कहाण्या हा एक अत्यंत धगधगता असा विषय आहे. एक शहनशाहने… दौलत का सहारा लेकर… हम गरिबों की मोहब्बत का… उडाया है मज़ाक… असं तो ताजमहालबद्दल बिनदिक्कत लिहून जातो आणि स्वत:च्या प्रेयसीला सांगतो, मेरे मेहबुब कही और मिला कर मुझे…
पंजाबच्या लुधियाना शहरात ९ मार्च १९२१ ला जन्मलेला साहिर खऱ्या अर्थाने मानवतेचा कवी होता. कौटुंबिक समस्येमुळे सोडावे लागलेले घर, लाहोरच्या वृत्तपत्रात मिळालेली तुटपुंज्या पगाराची नोकरी, लेखनात धर्मांधतेऐवजी माणुसकीचा पुरस्कार केल्याने गमवावी लागलेली नोकरी, देशद्रोह्याचा शिक्का बसल्याने पाकिस्तान सोडून भारतात परतणे, परत जिंदगीची घडी बसवण्याचा प्रयत्न, तरुणाईत वाट्याला आलेली असफल प्रेमाची दास्तान असं जगणारा साहिर एक क्रांतिकारी कवी ठरतो.