नेत्रदीपक अदाकारीने रसिकांना मोहिनी

‘बेल्स इन रेझोनन्स’ महोत्सवाचा समारोप

पुणे : नेत्रदीपक अदाकारी, मंत्रमुग्ध करणारी लयकारी आणि दुमदुमणारे ताल अशा भारावलेल्या वातावरणात ‘बेल्स इन रेझोनन्स’ (घुंगरांचा अनुनाद/निनाद) संगीत महोत्सवाचा समारोप झाला. पंडित योगेश शमसी यांचे बहारदार तबलावादन आणि पंडित राजेंद्र गंगानी यांच्या नेत्रदीपक अदाकारीने रसिकांना मोहिनी घातली.

तरुणांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी वाढण्यासाठी कार्यरत ‘ऋत्विक फाउंडेशन’तर्फे शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील दिवंगत दिग्गज गुरूंना समर्पित ‘बेल्स इन रेझोनन्स’ या पहिल्या नृत्य व संगीत महोत्सवाचे कोथरूडमधील ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथील सभागृहात आयोजन केले होते. पद्मविभूषण ज्येष्ठ कथक गुरू पंडित बिरजू महाराज व संगीत नाटक अकादमीचा संगीतरत्न पुरस्कारप्राप्त गुरू पंडिता रोहिणी भाटे यांना यंदाचा महोत्सव समर्पित करण्यात आला होता. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात पंडित योगेश समसी यांचे एकल तबलावादन झाले. समसी यांनी तिनतालात वादनाची सुरुवात केली. तालावर ठेका धरत रसिकांनी समेवर उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट करीत दाद दिली. विविध रचना, बंदिशी, तोडे, तुकडे, कथक नृत्यातील ‘नाधीधींना’चे प्रकार सादर करीत रसिकांची मने जिंकली. त्यांना मिलिंद कुलकर्णी यांनी हार्मोनियमवर साथसंगत केली.

“माझ्यावर या दोन्ही दिग्गजांनी संगीत, नृत्यवादन याचे संस्कार केले आहेत. पंडित बिरजू महाराज व पंडिता रोहिणी भाटे यांच्याकडून खूप शिकलो. त्यांचे सूक्ष्म संस्कार माझ्यावर झाले आहेत. आजचे सादरीकरण अशा ज्या सर्व गुरुतुल्य व्यक्तींकडून मी शिकलो त्यांना ही मानवंदना आहे,” अशा भावना योगेश समसी यांनी व्यक्त केल्या.

समारोपाचे सत्र जयपूर घराण्याचे ज्येष्ठ कथक नर्तक पंडित राजेंद्र गंगानी यांच्या नृत्याविष्काराने रंगले. नटराजाला वंदन करीत ‘नागेंद्र हाराय…’ या रचनेने सुरुवात केली. देहबोली, अभिनय, मुद्रा याला रसिकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. तिनताल सादर करीत रसिकांना खिळवून ठेवले. भावमुद्रेतील स्पष्टता रसिकांना विशेष मोहित करणारी ठरली. ‘मी लहानपणापासून पं. बिरजू महाराज आणि पंडिता रोहिणीताई यांना बघत आलो आहे. ते आपल्या आसपास आहेत. ते अवतारी होते, अशा भावना पं. राजेंद्र गंगानी यांनी व्यक्त केल्या.

Sumitra nalawade: