उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर शिंदे गटाच्या संपर्कात? आमदाराचा खळबळजनक दावा; म्हणाले, “ते आमच्या…”

मुंबई | Milind Narvekar – आजपासून (27 फेब्रुवारी) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे आमदार नसतानाही सभागृहात बसल्याचं आढळून आलं. यावरून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यादरम्यान, मिलिंद नार्वेकर आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे. ते विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलत होते.
मिलिंद नार्वेकर यांनी सभागृहात जाण्यासाठी कोणाची परवानगी घेतली असेल. पण त्यांची अनेक वर्षांपासून आमदार व्हायची इच्छा आहे. त्यामुळे आता ते मार्ग शोधत आहेत. आमच्या माहितीनुसार, त्यांना आता उद्धव ठाकरेही (Uddhav Thackeray) जवळचे मानत नाहीत. कदाचित ते लवकरच सभागृहात येतील, असा त्यांचा प्रयत्न आहे. तसंच नार्वेकर आणि इतर काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.
तसंच काल (26 फेब्रुवारी) वर्षा बंगल्यावरील चहा-पाण्याच्या खर्चावरून विरोधकांनी शिंदे सरकारवर टीका केली होती. या टीकेलाही संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्हाला या खर्चाची जाणीव आहे. पण, भेटायला येणारा कार्यकर्ता, शेतकरी, राज्यातील सामान्य नागरीक हा चहा-पाण्याशिवाय जाऊ नये, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. यामध्ये काहीही वावगं नाही. आधीचे मुख्यमंत्री आमदारांना भेटत नव्हते त्यामुळे सर्वसामान्य जनतेला भेटण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे त्यांचा खर्चही कमी होता, असा खोचक टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.