वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचाली; गृहमंत्रालयातील सूत्रांची माहिती
मुंबई | महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (DGP) रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदावर वर्णी लावण्यात आल्यानंतर ज्येष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. या दोन्ही नियुक्त्यांवरून राज्यात ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचालीला चांगलाच वेग आल्याचे समजते. याबाबत माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर मागील तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीत नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या प्रमुखपदी असलेले पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचीही बदली होण्याची शक्यता आहे.
एमपीएससीचे अध्यक्ष किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची सेवानिवृत्ती झाल्यानंतर हे पद मागील काही महिन्यांपासून रिक्त होते. आयोगाचे नवीन अध्यक्ष नेमण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. तेव्हा रजनीश सेठ यांनीही अर्ज केला होता. राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या सूचनेनुसार शासनाने पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती केली आहे. राज्याचे प्रमुखपद रिक्त होताच नवे पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती होण्याची प्रक्रियेला आता गती आल्याचे समजते. राज्य पोलीस दलाचा कारभार हाती घेताच रश्मी शुक्ला या आगामी निवडणुकांचे वारे लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांना मुंबईत प्राधान्य देण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यभरातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.06:20 PM