ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

मिथुन चक्रवर्ती यांना फाळके पुरस्कार

मनोरंजन क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण मंगळवारी येथील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते एका शानदार कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, तेव्हा सारे सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेले.

अंबारीव चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन दिग्दर्शनाचा, तर महेश भुवनंद यांना अट्टममधील कामासाठी सर्वोत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार मिळाला. याच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही प्राप्त झाला. रवी वर्मनला दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या पोन्नियिन सेल्वन : १ मधील कामासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार मिळाला. गुलमोहरला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार मर्मर्स ऑफ द जंगलला, तर सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड चित्रपटाचा पुरस्कार द कोकोनट ट्रीला देण्यात आला.

सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार ब्रह्मास्त्रसाठी अर्जित सिंहला देण्यात आला. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार प्रीतमला देण्यात आला आणि वाळवी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. पोन्नियिन सेल्वन – भाग 1 ला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. कार्तिकेय 2 ला सर्वोत्कृष्ट तेलुगु चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार उंचाईसाठी सूरज बडजात्या यांना, तर गुलमोहर या हिंदी चित्रपटासाठी अर्पिता मुखर्जीला सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद लेखकाचा पुरस्कार मिळाला. कांतारा चित्रपटासाठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आणि अट्टमला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

अभिनेत्री मानसी पारेख व नित्या मेनन या दोघींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना मानसीला अश्रू अनावर झाले होते. नीना गुप्ता यांना उंचाईसाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये