लोकशाही प्रगल्भ करणारी : आमदार देवयानी फऱांदे
विविध संस्थांमधून महिलांना मिळणारे वाढते प्रतिनिधित्व, विविध स्तरावर महिलांना मिळालेले आरक्षण, महिला बचत गट, बेटी बचाव बेटी पढाओ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नारी शक्ती सक्षमीकरणाच्या मोहीमेमुळे महिलादेखील निर्णय प्रक्रियेत सहभागी होत आहेत आणि विविध क्षेत्रात नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता वाढते आहे. महिला मतदारांची यावेळी वाढलेली संख्या हे त्याचेच स्पष्ट निदर्शक आहे. आज सर्व स्तरावर महिलांचे प्रतिनिधीत्व वाढते आहे. विविध क्षेत्रातल्या नोकऱ्या असतील. किंवा अनेक उच्च पदांवर महिलांकडून केले जाणारे नेतृत्व असेल. याशिवाय ग्रामीण स्तरावर आदिवासी भागामध्येसुद्धा महिला सरपंच, पंचायत समित्यांमध्ये महिला सदस्यांचा सहभाग, जिल्हा परिषदांमध्ये महिलांना मिळालेले प्रतिनिधीत्व, ग्रामसेविका, सरपंच, नगरसेविका, महापौर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अशा विविध ठिकाणी महिलांचे प्रमाण वाढत असल्याने त्याचा एक स्वाभाविक परिणाम त्या त्या भागातील महिलांच्या मानसिकतेवर झाला. त्यामुळे आपणही या सगळ्या लोकशाहीला बळकट करणाऱ्या प्रक्रियेत सक्रीय झाले पाहिजे अशी भावना वाढीला लागली. गेल्या लोकसभा निवडणूकीत महिलांचे मतदारांच्या एकूण संख्येत प्रमाण कमी होते. परंतु, मतदानाच्या टक्केवारीत महिलांचे प्रमाण वैशिष्टय़पूर्ण राहिले होते. म्हणजे महिला मतदारांची संख्या असूनही मतदानासाठी बाहेर पडलेल्या महिलांची संख्या मोठी होती. यावरून त्यांच्यात निर्माण झालेली जागरुकता खूप काही सांगून गेली होती.
विशेषतः गेल्या पाच वर्षामध्ये देशपातळीवर ते अगदी ग्रामीण स्तरावर, आदिवासी पाड्यांवर खूप काही बदल घडून आले आहेत. विशेषतः ते महिलांच्या बाबतीत प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजेत. एक समाज व्यवस्था म्हणून कुटुंब स्तरावर महिलेचे असलेले स्थान नेहमीच महत्वपूर्ण राहिलेले आहे. परंतु सामाजिक आणि राजकीय स्तरावर महिलांची सहभागिता वाढावी. त्यांच्यातील सर्व प्रकारच्या गुणवत्तेला, बुद्धीमत्तेला, नेतृत्वक्षमतेला अधिकाधिक वाव देण्याचा प्रयत्न झालेला आहे. संपूर्ण देशभर महिला बचत गटांना अभूतपूर्व आर्थिक साहाय्य केले गेले. महिला बचत गटांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु मोदीजींनी जनधन खात्यांची जी मोहीम राबवली त्यामध्येसुद्धा महिला खातेदारांची संख्या लक्षणीय असल्याचे आढळून येईल. अंगणवाडी सेविका या ज्या प्रकारची सेवा देतात. परंतु त्यांच्याकडून नकळतपणे एक सामाजिक नेतृत्वही केले जाते. त्याचादेखील एक परिणाम गावपातळीवर, वस्तीपातळीवर पाहायला मिळतो. मोदीजींनी तीन तलाकसारखी पद्धत रद्द केली. आणि महिलांना अधिक सन्मान मिळवून दिला. संपूर्ण देशभर या निर्णयाचे खूप मोठे सकारात्मक सामाजिक परिणाम दिसून आले. आणखी एक महिलांमधल्या जाणीवा समृद्ध करणारा भाग म्हणजे जो अतिशय साधा जरी वाटत असला तरी तो खूप मोठा परिणाम करणारा ठरला. तो म्हणजे उज्ज्वला गॅस योजनेतून अक्षरशः कोट्यवधी महिलांना त्याचा लाभ झाला. म्हणजे अगदी ग्रामीण स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतक्या व्यापक प्रमाणावर महिलांचा सन्मान किंवा त्यांचा विविध क्षेत्रात सहभाग वाढवण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो. ज्यातून महिलांनाही आपले नाव मतदार यादीत असले पाहिजे. आपणही प्रत्यक्ष मतदान करून निर्णय प्रक्रियेत राहिले पाहिजे असे वाटू लागले. हे नाकारता येणार नाही.
अगदी महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी आज स्थानिक स्वराज्य संस्थांमधून महिलांना पन्नास टक्क्यांपर्यंत मिळालेले प्रतिनिधीत्व त्यांना व्यक्तीशः आनंद देणारे ठरले. आणि माझा अनुभव असा आहे की या सामान्य किंवा राजकीय क्षेत्रात महिला अधिक तळमळीने आणि प्रामाणिकपणे काम करतात. त्यांना मिळणारा आनंद सामाजिक , राजकीय दृष्ट्या त्यांना प्राप्त झालेली प्रतिष्ठा त्यांच्यातला उत्साह वाढवणारी ठरली. आज देशभरामध्ये महिलांचे प्रमाण दह हजारी पुरुषांमागे ९४० वरून ९४८ पर्यंत वाढलेले आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी महिला मतदारांमधली वाढ ठरते.
आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्यानिमित्ताने मतदार याद्यांमध्ये समाविष्ट झालेल्या सर्व महिला मतदारांचे मी अभिनंदन तर करेनच शिवाय लोकशाही व्यवस्था बळकट करणारे हे फार मोठे सुचिन्ह आहे. निर्णय क्षमतेतून नेतृत्वाकडे महिलांचा होत असलेला हा प्रवास लोकशाहीतल्या समानतेच्या मूल्यांसाठी खूप आश्वासक ठरतो.
या सर्व प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाचा तितकाच मोठा सहभागही आहे. गेल्या दहा वर्षामध्ये सर्व प्रकारचे तंत्रज्ञान, सर्व स्तरापर्यंत पोहचवण्याचे काम झाले. भाजी विक्रेती महिला असेल किंवा रीक्षा चालवणारी महिला असेल. यांच्यासाठी जी पे, फोन पे यासारख्या गोष्टींनी सुविधा उपलब्ध करून दिली आणि मतदार नोंदणी ही प्रक्रियाही पूर्वीपेक्षाही खूप सुलभ पद्धतीने झाली. निवडणूक आयोगाने केलेले प्रयत्न राजकीय पक्षांनी मतदार नोंदणीसाठी राबवलेल्या मोहीमा यात तंत्रज्ञानाने ही मतदार नोंदणी सुलभ करून दिली. मतदारापासून ते विविध अधिकारापर्यंत महिलांनी मिळवलेले हे स्थान म्हणजे लोकशाहीच्या प्रगल्भतेचे मोठे निदर्शक आहे. फक्त अजूनही काही ठिकाणी महिला निवडून येतात. परंतु त्यांचे पती त्यांना विविध ठिकाणी साहाय्य करतात. ते साहाय्य त्यांनी करावे परंतु निवडून आलेल्या महिलांना अधिक स्वतंत्रपणे त्यांना त्यांचे काम करून दिले पाहिजे. अशी एवढीच अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करावीशी वाटते.
(शब्दांकनः लक्ष्मीकांत जोशी)