BMC निवडणुकांच्या तोंडावर, मनसेला मोठा धक्का! ‘मसल मॅन’चा तडकाफडकी राजीनामा

मुंबई : (MNS Leader Manish Dhuri Resign) मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. मनसेचे मसल मॅन म्हणून ओळखले जाणारे मनीष धुरी यांनी पक्षातील सर्व पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. दरम्यान, धुरी यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचं सांगितलं तरी ठोक कारण स्पष्ट केलं नाही. त्यामुळे हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मनीष धुरी हे मनसेचे अंधेरी विभाग अध्यक्ष होते. धुरी हे भारतीय विद्यार्थी सेनेपासूनचे राज ठाकरेंचे कट्टर समर्थक मानले जात होते. अनेक आंदोलनात मनीष धुरी यांचा आक्रमक सहभाग पाहायला मिळत होता. त्यांनी राज ठाकरे यांना पत्र पाठवून सर्वच पदांचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अचानक घेतलेल्या त्यांच्या या निर्यणामुळे पक्षात खळबळ उडाली. तर त्यांच्या जागेवर अंधेरी विभाग अध्यक्षपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर टाकली जाणार हे पाहाणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान धुरी यांनी राज ठाकरेंना पत्र लिहून म्हटलं की, मी सर्वच पदांचा राजीनामा देत आहे. तसंच आजपर्यंत पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दलही त्यांनी ठाकरेंचे आभार मानले. तर यापुढे पक्षात राज ठाकरे समर्थक म्हणून काम करणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. अन्य राजकीय पक्षात जाणार नसल्याचाही शब्द त्यांनी पत्रात राज ठाकरे यांना दिला आहे. पश्चिम उपनगरातील पक्षांतर्गत गटबाजीमुळेच धुरी यांनी राजीनामा दिल्याची चर्चा रंगली आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे धुरी यांच्या राजीनाम्यामुले मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.