ताज्या बातम्यारणधुमाळी
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. औरंगाबादमधील सभेप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय दंड विधानातील कलम 116, 117, 153 अ तसंच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम 135 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ मे रोजी राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये सभा घेतली होती. या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे यावरुन टीकेची झोड उठवली होती. या भाषणाप्रकरणी राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. मंगळवारी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात दोन समुहांमध्ये भांडण लावल्याचा आरोप ठाकरेंवर करण्यात आला आहे. तसंच प्रक्षोभक वक्तव्य करणे, अटींचं उल्लंघन केल्याचं एफआयआरमध्ये म्हटलं आहे.