‘रामूड्स : मूड्स ऑफ लव्ह’ म्युझिक अल्बमचे लोकार्पण
पुणे | हृदयाला प्रेमाचा हळुवार स्पर्श करणाऱ्या गीतांची मेजवानी असलेल्या ‘रामूड्स : मूड्स ऑफ लव्ह’ म्युझिक व्हिडीओ अल्बमचे नुकतेच लोकार्पण झाले. मनाला भुरळ घालणाऱ्या ‘ओ लकी…’, एकटेपण व आठवणींच्या हिंदोळ्यावर मनाची होणारी घालमेल दाखवणाऱ्या ‘रे मना तू…’, विरहाची भावना व्यक्त होणाऱ्या ‘तीशनगी…’ आणि ‘जिया जाये ना…’ या चार गाण्यांचा हा म्युझिक व्हिडीओ अल्बम आहे. व्ही. रमेश यांचे संगीत शिक्षक रविकांत वनारसे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय व स्नेहीजन यांची प्रमुख उपस्थित यावेळी होती.
व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर व गेल्या १५ वर्षांपासून सौदी अरेबिया स्थित पेट्रोकेमिकल कंपनीत कार्यरत असलेले भारतीय रमेश उदावंत उर्फ व्ही. रमेश यांचा निर्माता, संगीतकार व गीतकार म्हणून हा पहिलाच अल्बम असून, श्री एंटरटेनमेंटची प्रस्तुती, जस्ट कोलॅब व ध्वनि स्टुडिओची निर्मिती आहे. प्रसिद्ध गायक ऋषिकेश रानडे, जयदीप वैद्य, गायिका सावनी रवींद्र, ऋचा बोन्द्रे यांनी गाणी गायली आहेत. अजय नाईक यांनी संगीत संयोजन व अनुष्का नाईक यांनी दिग्दर्शन केले आहे. अभिनेता आशय कुलकर्णी, शुभंकर जोशी, शिवम बाकरे, अभिनेत्री साईशा पाठक, आयुषी कुलकर्णी यांनी अभिनय केला आहे. अनक भागवत यांनी छायाचित्रण केले. निर्मिती व्यवस्थापन आनंद पांडव व अमोल लांडगे यांनी केले. स्वामीनी पंडित यांनी सूत्रसंचालन केले.
व्ही. रमेश म्हणाले, “संगीतकार म्हणून माझा हा पहिलाच अल्बम आहे. तीस वर्षांपासूनचे हे स्वप्न आज पूर्ण झाले, याचा खूप आनंद आहे. संगीत हे माझे पहिले प्रेम आहे. वयाच्या दहाव्या वर्षी माझ्या मोठ्या भावाने आणलेल्या बेंजो वाजवण्यापासून माझा हा प्रवास सुरु झाला होता. शालेय वयातही गायन व हार्मोनियम वंदन केले. नव्वदीच्या दशकात नोकरीनिमित्त मुंबईत आलो. तेव्हा म्युझिक अल्बमचा ट्रेंड होता. स्वतःचा म्युझिक अल्बम बनवण्याची इच्छा होती. मात्र, नोकरी व अन्य प्राथमिकता यामुळे ही इच्छा मनातच राहिली आणि तीस वर्षांचा काळ गेला. काव्य लेखन सुरूच होते. कविता लिहून त्याचे गाण्यात रूपांतर करण्याचा छंद लागला. नोकरीनिमित्त २००८ मध्ये सौदी अरेबियाला गेल्यानंतर कीबोर्ड घेतला. २०१३ पासून या गाण्यांना चाली लावण्याचे काम सुरु झाले. आर्थिक स्थिती सक्षम झाल्यानंतर गेल्यावर्षी माझा सहकारी अभिनेता विद्याधर जोशी यांनी निर्माता-दिग्दर्शक अजय नाईक यांची ओळख करून दिली आणि या स्वप्नाला पूर्णत्वास नेता आले.”
अजय नाईक म्हणाले, “व्ही. रमेश यांची शब्दांची गुंफण अतिशय सुरेख व अर्थपूर्ण आहे. संगीत संयोजनाची उत्तम जाण त्यांना आहे. तीस वर्षांपासून मनात दडवून ठेवलेले त्यांचे स्वप्न पूर्ण झाले, याचा आनंद आहे. व्ही. रमेश एक प्रतिभावंत कवी, गीतकार व संगीतकार आहेत. त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करीत जस्ट कोलॅबच्या सर्व तरुण सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेत ही गाणी निर्माण केली आहेत. नवख्या मुलांना घेऊन व्हिडीओ करण्याचे आव्हान होते. पण सर्वानी सुरेख अभिनय केला आहे. सावनी रवींद्र, ऋचा बोन्द्रे, ऋषिकेश रानडे व जयदीप वैद्य यांच्या गायनाने या गाण्यांना छान स्वर मिळाले आहेत.