माऊंट फुजी : जपानची पारंपारिक ओळख
Mount Fuji : माऊंट फुजी हा जपानमधील सर्वात उंच पर्वत आहे. तब्बल १२,३८८ फूट उंचीची हा पर्वत टोकियोपासून जवळपास १०० किमी अंतरावर आहे. शंकाकृती आकारामुळे माऊंट फुजी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. जपानमध्ये माऊंट फुजीला पवित्र प्रतिक मानले जाते. त्यामुळे हजारो जपानी नागरिक हा पर्वत चढून जातात. अनेक जपानी कलाकृतींच्या केंद्रस्थानी माऊंट फुजी असतो. अनेक चित्रांमध्येही माऊंट फुजीचे दर्शन घडते.
माऊंट फुजीमध्ये दर ५०० वर्षांनी ज्वालामुखीचे उद्रेक होतात. सर्वात ताजा उद्रेक डिसेंबर १७०७ मध्ये झाला होता. या उद्रेकातून निघालेल्या राखेमुळे टोकियोचे अवकाश झाकोळून टाकले होते. १७०७ पासून माऊंट फुजी सुप्तावस्थेत असला तरी भूशास्त्रज्ञांच्या मते तो जिवंत आहे, असे मानले जाते. फुजी-हकोन-ईझू नॅशनल पार्कमधील माऊंट फुजी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. २०१३ नंतर याचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये केला आहे.
जपानी परंपरेनुसार इसविसनापूर्वी २८६ मध्ये एका भूकंपातून याचा जन्म झाला. मात्र प्रत्यक्षात या पर्वताचा जन्म लाखो वर्षांपूर्वी झाला आहे. पर्वताचा पाया जवळपास १२५ किमी परिघाचा आहे. तर पर्वताच्या पायाचा व्यास ४०-५० किमीचा आहे. पर्वताच्या शिखरावरील व्यास ५०० मीटरचा आहे. माऊंट फुजीच्या उत्तरेकडील उतारावर पाच सरोवर आहेत. यात लेक यामानाका, लेक कावागुची, लेक साई, लेक शोजी आणि लेक मोटोसुचा समावेश आहे. यातील लेक यामानाका सर्वात मोठे म्हणझे ६.४ चौ. किमी विस्ताराचे आहे. या परिसरात पर्यटकांसाठी अनेक ठिकाणं विकसित करण्यात आले आहेत. त्यात अम्युझमेंट पार्क, बोटॅनिकल गार्डन, स्की रिसॉर्ट आणि इतर ठिकाणांचा समावेश आहे. तर माऊंट फुजीच्या पश्चिमेकडील खोऱ्यात असंख्य गोल्फ कोर्स आणि इतर आकर्षणाची केंद्रे आहेत. माऊंट फुजीच्या आसपासच्या परिसरात जमिनीखालील पाण्याची पातळी चांगली आहे. त्यामुळे अनेक उद्योग आणि शेती यांचा विकास झाला आहे.
माऊंट फुजी पवित्र पर्वत असल्यामुळे या पर्वताभोवती अनेक मंदिरे आणि समाधीस्थळं आहेत. या पर्वताचा चढाई करण्याचा मुख्य सीझन १ जुलै ते २६ ऑगस्ट दरम्यान असतो. सर्वसामान्यपणे चढाई करणारे रात्री सुरूवात करतात जेणेकरून पहाटे शिखरावर पोचता येते.